पुणे : प्रतिनिधी
ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडी गायब झाली. दोन दिवस राज्यात धुके आणि ढगाळ हवामानाचे मळभ कायम राहणार आहे. दोन ते तीन दिवस राज्यात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. विदर्भात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात वातावरण सामान्य राहण्याची शक्यता आहे.
आज विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून येणा-या बाष्पयुक्त वा-यामुळे ढगाळ वातावरण राहणार आहे. थंड वा-याचा जोर जास्त राहिल्यास पारा घसरण्याची देखील शक्यता आहे. पुढील दोन दिवस अशाच पद्धतीचे वातावरण राहण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
रविवारपर्यंत थंडी कायम
बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर आर्द्रता आणणा-या वा-यामुळे महाराष्ट्रात सध्या थंडी नाहीशी झाली आहे. रविवारपर्यंत महाराष्ट्रात फारशी थंडी नसण्याची शक्यता आहे. रविवारनंतर महाराष्ट्रात हळूहळू थंडी परतण्याची शक्यता आहे. त्यापुढील तीन दिवस म्हणजे १९ ते २१ जानेवारी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी परतण्याची शक्यता आहे.