नागपूर : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून उपराजधानी नागपूरसह विदर्भात सुरू असलेल्या धुंवाधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली आहे. अतिवृष्टीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आजही विदर्भातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
एकट्या नागपूर शहरात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाले, ओढे ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक भागातील घरांत पावसाचे पाणी शिरल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे. परिणामी आज जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र काही तासांच्या पावसाने स्मार्ट सिटी म्हणवणा-या उपराजधानी नागपूरची दाणादाण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
नागपूर शहरात आज (शनिवार, २० जुलै) पहाटे ५.३० ते सकाळी ८.३० या तीन तासांत ८१.८ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या बाबतची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. परिणामी नागपूरच्या भांडेवाडी कचरा डेपोजवळ पावसाच्या पाण्यासह डम्पिंग यार्डचा कचरा वाहून बाहेर आला आहे. त्यामुळे डम्पिंग यार्डजवळच्या सूरजनगर वस्तीत अनेकांच्या घरी कच-यासह घाण पाणी शिरले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी सर्व नाले स्वच्छ केल्याचा दावा केला होता.