जोरदार पाऊस, मुंबई, पुण्यासह मराठवाड्यातही हजेरी
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात विदर्भ, कोकणासह मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यातही ब-याच भागात आज पावसाने हजेरी लावली. विशेषत : विदर्भ, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असून, सर्वत्र नद्या ओसंडून वाहात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. तसेच पाणी रस्त्यावरून वाहात असल्याने वाहतूकही खोळंबली. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नद्यांना पूर आला असून, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. परंतु मराठवाड्यात अजूनही पावसाचा जोर कमीच आहे.
विदर्भात पावसाने बरेच दिवस प्रतीक्षा करायला लावली. आता शनिवारपासून नागपूरसह विदर्भात पावसाचा जोर वाढला असून, अनेक नद्यांना पूर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
कोकणातही दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर आहे. रत्नागिरीतील खेड-दिवाणखवटी येथे नदीला पूर आला असून ७ गावांचा संपर्क तुटला. जगबुडी, नारंगी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली. याशिवाय संगमेश्वरमधील गड नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी संगमेश्वरमधील बाजारपेठेत घुसले. चिपळूण शहरातही वाशिष्टी नदीतील पुराचे पाणी शिरले असून या नदीने धोक्याची पातळी ओलांडली. खेड शहरातून देवने पुलाकडे जाणार रस्ता पाण्याखाली गेला आहे. रायगड जिल्ह्यातही उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. तसेच कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा या नद्यांनीदेखील इशारा पातळी ओलांडली आहे.
दरम्यान, मुंबई, पुणे भागातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईत सखल भागात आणि रस्त्यावर पाणीच पाणी तुंबले. भिवंडी शहरासह ग्रामीण भागालाही मुसळधार पावसाचा फटका बसला. तसेच घरांमध्येही पाणी घुसले. कल्याण परिसरातही पावसाची रिपरिप सुरू असून, उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुण्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात भोर वेल्ह्यात १०० मि.मी. तर मावळ, भीमशंकर परिसरात २०० मि.मी. पावसाची नोंद झाली. पवना धरण परिसरातही दमदार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही ब-याच भागात आज पावसाने हजेरी लावली.
जायकवाडीतील
पाणीसाठा जैसे थे
इतर लघु, मध्यम प्रकल्पातही अत्यल्प वाढ
पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला. परंतु मराठवाड्यात पावसाचा जोर कमी असल्याने जायकवाडी धरणात केवळ ४.१ टक्के म्हणजेच केवळ ३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.जूनमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, जुलैच्या दोन आठवड्यात पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे पाणी साठा वाढला नाही. २१७० दलघमी जलक्षमता असलेल्या या धरणावर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील हजारो गावांची तहान अवलंबून आहे. मराठवाड्यात लघु, मध्यम व मोठी अशी एकूण ९२० धरणे आहेत. मात्र, जोरदार पावसाअभावी अजूनही ती १०.६० टक्के एवढीच भरली आहेत. राज्यातील इतर ५ विभागांच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठा सर्वात कमी असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.