लातूर : प्रतिनिधी
मुलांनी मोबाईल पासून दूर राहावे, निसर्गामध्ये रमावे निसर्गाचेच फोटो काढावे, त्यातच खरा आनंद आहे. पण आजची मुले स्वत:चाच फोटो सेल्फीच्या माध्यमातून काढू लागले आहेत आणि त्यामध्येच आनंद शोधण्याचा प्रयत्न करू लागली आहेत. मुलांच्या चुकांचीही जबाबदारी आई-वडिलांनी घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी आपला आनंद सेल्फी न काढता एक झाड लावून साजरा करावा, असे प्रतिपादन अरविंद जगताप यांनी केले.
दयानंद कला महाविद्यालयात वार्षिक स्रेह संमेलन ‘कलातीर्थ २०२५’ चे आयोजन करण्यात आले. उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गायक अभिजीत जाधव, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख प्रा.डॉ. रमेश पारवे, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, डॉ. बी. आर. पाटील, सुपर्ण जगताप, जयमाला गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दिक्षित, सांस्कृतीक विभागप्रमुख डॉ. संतोष पाटील, क्रीडा विभाग संचालक डॉ. अशोक वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष कदम, राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख डॉ. शिवकुमार राऊतराव, कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास उपस्थित होते.
यावेळी गायक जाधव म्हणाले, दयानंद कला महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एक नामांकित महाविद्यालय असून यात अनेक कलावंत घडले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कार बीजे आवश्यक असतात. ती बीजे रोवण्याचे कार्य दयानंद कला महाविद्यालय करते आहे. त्यांनी संबळ वादन व शिवगीत सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
वार्षिक स्रेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम व विविधकला गुणांचे सादरीकरण करण्यात आले. यात भारुड, लावणी, छक्कड, सामुहिक नृत्य, एकपात्री अभिनय आदी कलाप्रकार सादर करण्यात आले. वार्षिक स्रेहसंमेलन विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, वाद्यांचा ताल, लयबद्ध थिरकणारी पावलं, लचकणारी कंबर अन् रसिकांनी दिलेली टाळयांची दाद अवर्णनीय होती. प्रा. डॉ. अंकुशकुमार चव्हाण व प्रा. महेश जंगापल्ले यांनी पारितोषिक वितरणाचे वाचन केले. प्रसन्न आणि उत्साहाच्या वातावरणात विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी कलातीर्थ २०२५ स्रेहसंमेलनाचा पहिला दिवस उत्साहात पार पडला. याप्रसंगी महाविद्यालयातील वर्ग प्रतिनिधी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्रीनिवास बरीदे व आदिती कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. स्फूर्ती समुद्रे यांनी केले.