मुंबई : विशेष प्रतिनिधी
आज पासून विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची देखील निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी उद्या दुपारी बारापर्यंत अर्ज करता येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा भाजपकडून राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज करणार आहेत.
विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव भाजपकडून निश्चित झाले असून ते उद्या अर्ज दाखल करणार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष देखील आता भाजपचाच होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात दोन प्रमुख पक्षात पडलेल्या फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाची लढाई तसेच आमदार अपात्रतेचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टात पोहोचलं. त्यानंतर आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. दरम्यान आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर हेच विधानसभेचे अध्यक्ष होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीनं तब्बल २३१ जागा जिंकल्या. भाजप हा महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष राहिला. भाजपनं १३२ जागांवर विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाला ५७ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला, तीन प्रमुख पक्ष मिळून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला एकत्र केवळ ५० जागाच जिंकता आल्या.