29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरविधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी ६ पासून थांबणार

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी ६ पासून थांबणार

लातूर : प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान संपण्यापूर्वीचे शेवटचे ४८ तास हे सोमवार, १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ पासून सुरु होत आहेत. त्यामुळे सोमवारी सायंकाळी ६ पासून राजकीय प्रचार बंद होणार आहे. या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे सांगितले. मतदान प्रक्रिया संपण्यापुर्वीच्या ७२ तासात करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
सामान्य निवडणूक निरीक्षक डॉ. करुणा कुमारी, लक्ष्मीकांत प्यारेलाल प्रधान, साकेत मालवीया, पोलीस निवडणूक निरीक्षक प्रमोद कुमार मंडल, निवडणूक खर्च निरीक्षक काकराला प्रसांत कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी संगीता टकले, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक केशव राऊत यांच्यासह सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मतदान प्रक्रिया संपण्यापूर्वीच्या ७२ तासांसाठीची कार्यचालन प्रणाली जिल्ह्यात लागू झाली आहे. तसेच सोमवारी सायंकाळी ४८ तासांची कार्यचालन प्रणाली लागू होणार आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेचा भंग होवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असून भरारी पथके अधिक गतिमान पद्धतीने कार्यरत राहतील. तसेच मतदारांना रोकड, भेटवस्तू, मद्याचे वाटप होवू नये, तसेच त्यांना धमकाविण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी जिल्ह्यात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्रावरील प्रक्रियेचे वेब कांिस्टग करण्यात यावे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत वेब कांिस्टगसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करून त्याबाबत निगराणी करण्यात यावी, असे सामान्य निवडणूक निरीक्षक डॉ. करुणा कुमारी यांनी सांगितले.
चार पेक्षा अधिक मतदान केंद्र एकाच परिघात असलेल्या ठिकाणी मतदारांची गर्दी होवू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना सामान्य निवडणूक निरीक्षक साकेत मालवीया यांनी दिल्या. ईव्हीएम मशीन सोबत असताना मतदान पथकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मतदान पथके रवाना होताना याबाबत सूचना द्याव्यात, असे पोलीस निवडणूक निरीक्षक प्रमोद कुमार मंडल यांनी सांगितले.
शेवटच्या काही तासात मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार घडू नयते, यासाठी सर्व भरारी पथके, व्हीएसटी यांनी अधिक दक्ष राहून काम करण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक काकराला प्रसांत कुमार यांनी दिल्या. मतदारांना प्रलोभने, आमिष दाखविण्यासाठी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठीकठिकाणी पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. निवडणूक केंद्रावरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR