मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत. दुधाच्या बाजारभावामध्ये वाढ करून ४० रु. प्रति लिटर इतके करावे, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करीत आहेत. त्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रश्नावरून सत्ताधा-यांना धारेवर धरले. आंदोलकांनी विधान भवनाबाहेर दूध ओतून आंदोलन केले. आम्हाला निकष सांगू नका. शेतक-यांना मदत करा. विरोधी बाकावरील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांवर टीका केली.
खतावर, दुधावर सरकारने जीएसटी लावला, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्य सरकार या मागणीला गांभीर्याने घेत नाही असे शेतक-यांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर ‘किसान सभा’ राज्यव्यापी आंदोलन करीत आहे.
प्रति लिटर १० ते १५ रुपयांचा तोटा दूध उत्पादक शेतक-यांना सहन करावा लागत आहे. सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान ४० रुपये दर द्यावा, दूध अनुदान पुन्हा सुरू करावे, वाढता उत्पादनखर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर दहा रुपये करावे, अनुदान बंद असताना दूध घातलेल्या शेतक-यांना या काळातील अनुदान द्यावे आदी मागण्या संघर्ष समितीने केल्या आहेत.
दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार-घोटी राजमार्गावर रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले. संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात आंदोलन करण्यात आले.
दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यात दूध दरासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. दुधाला किमान ४० रुपये भाव मिळावा यासह अनुदानाच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत
कोल्हार-घोटी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन
दुधाला तातडीने प्रति लिटर ४० रुपये दर द्यावा, जो व्यावहारिकदृष्ट्या देणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हापासून दुधाचे दर पडले आहेत, तेव्हापासून आतापर्यंत दुधाच्या दरातील फरकाची नुकसानभरपाई प्रति लिटर १५ रुपये याप्रमाणे रक्कम तातडीने शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करावी. आदी मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. २८) कोल्हार-घोटी राज्यमार्गावर चिखली गावात रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. शिव आर्मी दूध उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे.