सोलापूर : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सहा पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक निरीक्षक, दोन दुय्यम निरीक्षक, तीन जवान, एक सहायक दुय्यम निरीक्षक, एक वाहन चालक असा स्टाफ समाविष्ट आहे.
सोलापूर शहराकरिता दोन पथके, पंढरपूर माळशिरस विभागात एक-एक पथक, याव्यतिरिक्त परराज्यातील दारूची तस्करी रोखण्यासाठी सीमा तपासणी नाक्याचे पथक व एक जिल्हा भरारी पथक नेमण्यात आलेली आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दोन रुपये किमतीचे पन्नास हजार देशी एकदिवसीय मद्य सेवन परवाने व पाच रुपये किमतीचे पन्नास हजार विदेशी मद्य एकदिवसीय परवाने सर्व दारू दुकानांना वितरित करण्यात आलेले आहे.
परराज्यातील दारू रोखण्यासाठी वाहनांची तपासणी सुरू आहे. तसेच ३१ डिसेंबर रोजी धाबे, हॉटेल येथे अवैध दारूची विक्री होणार नाही तसेच त्या ठिकाणी बसून पिण्याची व्यवस्था करणाऱ्या विरुद्ध विभागाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
विनापरवाना दारूची विक्री किंवा पार्टी आयोजित केल्यास संबंधित मालक व आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवला जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिला आहे