25.4 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeराष्ट्रीयविमान रद्द झाले तर ७ दिवसांत रिफंड, दर न वाढवण्याचा सल्ला

विमान रद्द झाले तर ७ दिवसांत रिफंड, दर न वाढवण्याचा सल्ला

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा जोर एवढा होता की, त्यामुळे ८८ वर्षे जुना रेकॉर्ड तुटला. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल-१ च्या पार्किंगचे छप्पर कोसळले. या अपघातानंतर एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली असून, यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

या अपघातामुळे टर्मिनल १ बंद आहे आणि विमान वाहतूक मंत्रालय टी-२ आणि टी-३ टर्मिनल्सच्या सुरळीत कामकाजासाठी २४/७ वॉर रूमची स्थापना करण्यात आली. वॉर रूम रद्द केलेल्या उड्डाणांचा पूर्ण परतावा सुनिश्चित करेल. तसेच उपलब्धतेनुसार पर्यायी प्रवासी मार्गाची तिकिटे प्रदान करेल. याशिवाय, मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

टर्मिनल बंद झाल्यामुळे विमानाचे तिकीट दर वाढवू नका, असा सल्ला विमान कंपन्यांना देण्यात आला आहे. सर्व परतावे ७ दिवसांच्या निर्धारित कालावधीत पूर्ण केले जातील. प्रवाशांना तत्काळ मदतीसाठी संपर्क क्रमांकासह इतर तपशील दिले जातील, असेही या आढावा बैठकीत सांगण्यात आले.

नागरी विमान वाहतूक मंत्रालय सर्व विमानतळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सर्व लहान आणि मोठ्या विमानतळांवर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात परिपत्रक जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या दोन ते पाच दिवसांत निरीक्षण पूर्ण केले जाईल. यासंदर्भातील एक अहवाल नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला सादर केला जाईल. तसेच सुरक्षा उपायांबाबत दीर्घकालीन धोरणे प्राधान्याने तयार केली जातील, असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR