30.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeक्रीडाविराटच्या ‘शतका’सह भारताचा विराट विजय

विराटच्या ‘शतका’सह भारताचा विराट विजय

क्रिकेटचा सामना आणि तोही पाकिस्तान विरुद्ध म्हटल्याबरोबर संपूर्ण देशभर रहदारी ओसरली होती. रात्री विजय मिळाल्याबरोबर पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली. क्रिकेट प्रेमींनी शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय अशा घोषणा देत कोल्हापूरचा छत्रपती शिवाजी चौक दणाणून सोडला. तिरंगा व विराट कोहलीचे फोटो घेतलेल्या तरुण-तरुणींनी आतषबाजी करत फटाके फोडले. लहान मुलेही मोबाईलवर फोटो घेत होते. जस जसा विजय समीप येत होता तसतसे हातात राष्ट्रध्वज व भगवा घेऊन शिवाजी पूतळ्याजवळ जल्लोष करण्यासाठी तरुण वर्ग जमू लागला. वाढती गर्दी पाहता पोलिसांनी चारी रस्त्यांवर बॅरिकेट्स लावले. रात्री १२ नंतर मात्र शिवाजी चौकातील गर्दी पांगवण्यात आली.

रविवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीचे नाबाद शतक, श्रेयस अय्यरची तुफानी अर्धशतकी खेळी व कुलदीप यादव, हार्दिक पंड्या यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला आणि २०१७च्या चॅम्पियन्स स्पर्धेत अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची व्याजासह परतफेड केली.

पाकला अवघ्या २४१ धावांत गुंडाळले. यानंतर भारतीय संघाने विजयी लक्ष्य ४२.३षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. . पाकने विजयासाठी दिलेल्या २४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. रोहितने नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळताना १५चेंडूत ३चौकार व १ षटकारासह २० धावा केल्या, पण शाहीन आफ्रिदीच्या यॉर्करवर तो बोल्ड झाला. यानंतर शुभमन गिल व विराट कोहली यांनी ६९ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी जमली असतानाच अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेला गिल(४६) ला अबरार अहमदने बाद केले.दोघांनी तिस-या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. शुभमन बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. यादरम्यान, श्रेयसने आक्रमक खेळताना ६७ चेंडूत ५चौकार व १षटकारासह ५६ धावांची शानदार खेळी साकारली. अर्धशतकानंतर तो मात्र लगेचच बाद झाला. मॅच ऐन रंगात आली होती.

जिंकणार हे नक्की झाले होते तरी विराटचे शतक बघण्यासाठी सारे आतुर होतो. सोबतीला श्रेयस आहे म्हणजे सेंचुरी होणार हे सूत्र सहज होते. इतक्यात श्रेयस आऊट झाला. ‘आता हार्दिक पांड्या सोडून कोण पण येऊ दे’ अशी प्रार्थना करत असताना हेच महाशय आले. बरे, आल्या आल्या त्याने नेहमीच्या स्टाईलमध्ये रंधा ओढायला सुरुवात. उरल्या ४० पैकी २५ रन हाच चोपणार आणि विराटची सेंचुरी हुकणार. आम्हाला जिंकायचे होते पण विराटच्या सेंचुरीसह आणि हेच हार्दिक होऊ देणार नाही असे वाटत असताना हार्दिक आऊट झाला. विराट ९४ वरअसताना शाहीनने ४२ व्या षटकात तीन वाईड बाँल टाकले आणि तेरा धावा दिल्या, का तर विराट ची सेंचुरी होऊ नये. पण या अखिलाडू वृत्ती समोर विराट पुरून उरला. विराटने मात्र संयमी खेळी करताना वनड क्रिकेटमधील आपले विक्रमी ५१वे शतक साजरे केले. मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराटने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला आणि स्वत: चे शतकही पूर्ण केले आहे. त्याने १११ चेंडूत ७ चौकारासह नाबाद १००धावा केल्या.

या विजयासह टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीत सेमीफायनलमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले. सलग दोन पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा आहे. आता, भारताची पुढील लढत २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध होईल.
मैदानराबाहेरून
डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR