नवी दिल्ली : भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर लगेचच त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला . टी-२० व्या अंतिम सामन्यानंतर विश्वचषकाचे विजेतेपद साजरे करताना पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला की, आता गुडबाय म्हणण्याची यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही आणि रोहितने निवृत्तीची घोषणा केली.
मी ही ट्रॉफी आणि टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी आतुर होतो आणि आता तो जिंकण्यात आम्हाला यश मिळाले आहे, असे रोहित म्हणाला. दरम्यान, रोहितने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो भारताकडून कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळत राहणार आहे.
या निर्णयामुळे रोहितच्या टी-२० कारकिर्दीचा समर्पक शेवट झाला, कारण त्याने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकून त्याची सुरुवात केली आणि टी-२० विश्वचषक जिंकूनच त्याचा शेवट ही केला आहे. या १७ वर्षांत रोहितने फलंदाज म्हणून अभूतपूर्व कामगिरी केली. त्याने १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३२.०५ च्या सरासरीने ४२३१ धावा केल्या. रोहितने सर्वांधिक पाच शतके या फॉरमॅटमध्ये ठोकली आहेत.
जे कोणत्याही इतर भारतीय फलंदाजाने केलेली नाहित. यासोबतच त्याच्या नावावर ३२ अर्धशतके आहेत. शेवटी रोहित म्हणाला की, हा माझा शेवटचा सामना होता. मी जेव्हापासून टी-२० खेळायला सुरुवात केली तेव्हापासून मला हे स्वरूप आवडते. मला विश्वचषक जिंकायचा होता. तो मी जिंकला असे रोहित म्हणाला.हिटमॅनच्या या वक्तव्यानंतर प्रसारमाध्यमांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे अभिनंदन केले आणि प्रोत्साहन दिले.
रोहितने शेवट गोड केला
३७ वर्षीय रोहितने २०२२ टी-२० विश्वचषक स्पर्धेतही भारताचे नेतृत्व केले होते, जिथे संघ उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाला होता. एक वषार्नंतर, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर ५० षटकांच्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली, परंतु अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. मात्र रोहितने २०२४ च्या टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरून शेवट गोड केला आणि भारताचा सतरा वर्षाचा दुष्काळ संपुष्टात आणला.