नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून बाद करण्याच्या निर्णयाविरोधात देशात संतापाची लाट आहे. तसेच त्याचे पडसाद संसदेमध्येही उमटत आहेत. दरम्यान, आज राज्यसभेमध्ये विनेशवरून जोरदार गदारोळ झाला. दरम्यान, हा गदारोळ एवढा वाढला की, सभापती जगदीप धनखड यांना जड अंत:करणानं आसनावरून उठावं लागलं.
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्या वर्तनावर सभापती धनखड ताशेरे ओढले. तसेच सभागृहाच्या नियमानुसार वर्तन करण्यास सांगितले. संतप्त झालेल्या जगदीप धनखड यांनी सांगितले की, सभागृहामध्ये दररोज माझा अपमान केला जात आहे. आसनावर ओरडून बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यानंतर ते सभापतींच्या आसनावरून उठून निघून गेले.
याबाबत जगदीप धनखड म्हणाले की, हे माझ्यासाठी आव्हान नाही आहे. तर हे राज्यसभेच्या सभापतिपदासाठी आव्हान आहे. त्यांना वाटतं की, या आसनावर बसलेली व्यक्ती या पदासाठी पात्र नाही आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना न हसण्याची ताकिद दिली. तसेच मी व्यथित मनाने या आसनावरून उठत आहे, असे सांगितले आणि ते निघून गेले.