19.3 C
Latur
Tuesday, January 14, 2025
Homeसंपादकीयविरोधक औषधालाही नको!

विरोधक औषधालाही नको!

लोकशाहीत विरोधकाला अनन्यसाधारण महत्त्व असले तरी विरोधक पूर्णत: गाडला गेला पाहिजे अशीच भारतीय जनता पक्षाची रणनीती दिसते. भाजप नेत्यांनी वारंवार अशा प्रकारची वक्तव्ये करून आपल्या पक्षाच्या रणनीतीला, संकल्पनेला पाठबळ दिले आहे. निवडणूक कोणतीही असो, विरोधकांना पार नेस्तनाबूत करून टाकायचे हेच भाजपचे उद्दिष्ट असते. घराणेशाही संपवून टाकण्याचा ध्यास घेणारी भाजप एकाधिकारशाहीचे लांगुलचालन करताना दिसते. विरोधक संपवून टाकला तर एकाधिकारशाहीचाच धांगडधिंगा सुरू राहणार ना! प्रदेश भाजपच्या ‘महाविजयी अधिवेशना’ची सांगता रविवारी शिर्डी येथे झाली. समारोपप्रसंगी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ग्रामपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा व महापालिकांपासून संसदेपर्यंत भाजपच्या विजयाचा झेंडा फडकत राहिला पाहिजे. महाराष्ट्रात भाजपची इतकी अजेय व बलशाली उभारणी करावी की, पुन्हा कोणाचीही दगाबाजी करण्याची हिंमत होणार नाही. भाजपने विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे राजकारण जमिनीत गाडले आणि उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली. आता आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी व्हायचे आहे.

राज्यात भाजपची वाटचाल शतप्रतिशतकडे राहील. शिर्डी येथे भाजपच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाला राज्यातील भाजपचे सर्व नेते, १५ हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे. या अधिवेशनात व्यासपीठावर महापुरुषांच्या प्रतिमांसोबतच पहिल्यांदाच संविधानाची प्रत देखील ठेवण्यात आली होती. या अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, १९७८पासून शरद पवारांनी दगाफटक्याचे राजकारण सुरू केले होते. तेसुद्धा जमिनीत २० फूट गाडण्याचे काम जनतेने केले आहे. उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये विचारधारा सोडून दगा देत खोटे बोलून मुख्यमंत्रिपद मिळवले होते. त्यांनाही लोकांनी जागा दाखवून दिली. लोकसभेनंतर विधानसभेत आपला विजय होईल असे विरोधकांना वाटत होते पण त्यांचे स्वप्न मोडण्याचे काम जनतेने केले. काही निवडणुका अशा असतात, ज्या देशाचे राजकारण बदलून टाकतात. महायुतीने हे करून दाखवले.

या सा-या गोष्टींचे शिल्पकार भाजपचे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्रातील महाविजयानंतर आपण सगळे एकत्र आलो आहोत असे सांगून अमित शहा म्हणाले, तुम्ही किती मोठे कार्य केले आहे हे तुम्हाला माहीत नाही. तुमच्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. आपले मित्रपक्ष खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादीलासुद्धा यश मिळाले. २०२४ पर्यंत महाराष्ट्र अस्थिर होता त्याला स्थिर करण्याचे कार्य तुम्ही सर्वांनी केले आहे. आपल्या विजयाच्या मागे आपली एकजूट होती. ४० लाख सदस्य बनले आहेत अजून दीड कोटी करायचे आहेत. एकही बूथ असे नसावे की जिथे २५०पेक्षा कमी सदस्य आहेत. सर्व महानगरपालिका, नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. यात विरोधकांना बसायलासुद्धा जागा मिळणार नाही, याची काळजी तुम्ही सर्वांनी घेतली पाहिजे.

पंचायतमध्ये भाजप, तहसीलमध्ये भाजप, महापालिकेत भाजप, महाराष्ट्रात भाजप आणि देशातही भाजप! शरद पवार इतकी वर्षे कृषिमंत्री राहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, देशाचे मंत्री राहिले, मात्र ते शेतक-यांच्या आत्महत्यांपासून महाराष्ट्राला मुक्त करू शकले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार प्रत्येक शेतक-याच्या शेतात पाणी पोहोचवण्याचे काम करत असून हे काम केवळ भाजपच करू शकते असे अमित शहा म्हणाले. यावरून देशात प्रादेशिक पक्ष शिल्लकच ठेवायचे नाहीत अशीच भाजपची इच्छा दिसते. त्यानुसार त्यांची पावले पडत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीची शकले पडल्यानंतर अन्य प्रादेशिक पक्षांचा घास घेण्याची तयारी भाजपने केली आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षाला नेस्तनाबूत करण्याचे भाजपने ठरवले आहे.

त्यातूनच लोकशाही संपवण्याचा डाव भाजपने आखला आहे. केंद्रात असो की राज्यात अथवा अगदी ग्रामपंचायतीतही सक्षम विरोधी पक्षनेता असणे हे सुदृढ लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत बिघाडी सुरू आहे तर दिल्लीतही विरोधी पक्षात पडझड सुरू आहे. सत्ताधा-यांच्या चुकीच्या धोरणावर सडकून टीका करून त्यांना बिनचूक काम करण्यास भाग पाडणे हे महत्त्वाचे काम करण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेत्याची असते. पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री हे सरकारचे प्रतिनिधी असतात तर विरोधी पक्षनेता हा थेट जनतेचा प्रतिनिधी असतो. सरकारवर अंकुश ठेवणे, राज्यातील, देशातील ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवणे ही विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. त्यासाठी लोकशाहीने विरोधी पक्षनेत्याला विविध संसदीय आयुधे बहाल केली आहेत. आता भाजपने शतप्रतिशत सरकार हे लक्ष्य ठेवले आहे. येत्या काही वर्षांत त्यांची वाटचाल त्या दिशेनेच असणार. म्हणजे पक्षाची ताकद वाढल्यावर त्यांना सहकारी पक्षांची गरज उरणार नाही.

सध्या सहकारी पक्ष सुपात बसून हसत असले तरी पुढील निवडणुकीत ते कुठे असतील ते सांगायची गरज नाही. विरोधी पक्षाला संपवायला निघालेले सहकारी पक्षाला कसे सोडतील? देशात प्रादेशिक पक्ष नावालाही शिल्लक ठेवायचा नाही ही भाजपची इच्छा आहे. प्रादेशिक पक्ष हा लोकशाहीसाठी धोका आहे आणि त्यांचे अस्तित्व फार काळ राहणार नाही असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. भाजप राज्याराज्यातील विरोधी पक्ष पूर्णपणे संपवण्याच्या प्रयत्नात आहे. सत्ताधा-यांकडे पाशवी बहुमत असणे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. सध्या देशात विरोधी पक्षांची अवस्था वाईट आहे. सारेच सत्ताधारी झाले तर लोकशाही राहणारच नाही. म्हणून विरोधी पक्षांनी सुद्धा आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. विरोधी पक्ष हा लोकशाहीचा आत्मा आहे. विरोधी पक्षच संपले तर लोकशाहीसुद्धा संपेल. भाजप शुद्धीवर असेल तर त्यांना लोकशाहीचे महत्त्व कळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR