दादा म्हणतात शनिवारी विस्तार, मुख्यमंत्री म्हणतात तारीख ठरलेली नाही!
– बावनकुळे-शिंदेंची
पाऊण तास खलबते
-अपेक्षित खाते मिळत नसल्याने नाराजी
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन आठवडा झाला तरी मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अडलेलेच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर विस्ताराची तारीख अजून निश्चित झाली नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे विस्ताराबाबत अजूनही संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. शिंदे यांना अपेक्षित खाती मिळत नसल्याने ते अजूनही नाराज असल्याची चर्चा आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशन १६ तारखेला सुरू होत असून त्यापूर्वी विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी आज दिल्लीत पक्षाच्या विविध नेत्यांची भेट घेऊन भाजपा मंत्र्यांची नावे निश्चित केल्याची चर्चा आहे. परंतु त्यांनी १४ तारखेला विस्तार होणार की नाही याबाबत संदिग्धता कायम ठेवली. यामुळे मित्रपक्षांसोबतचे काही प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. फडणवीसांनी मात्र कोणताही तिढा नाही, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे मंत्री कोण असावेत, याचा निर्णय घेतील, असे सांगितले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होऊ शकेल, असे सांगितले.
फडणवीस व अजित पवार दिल्लीला गेले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मुंबईतच राहिल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली होती. मात्र मी माझ्या कामासाठी दिल्लीला आलो आहे, अजित पवार त्यांच्या कामासाठी आले आहेत. एकनाथ शिंदे यांचे काम नसल्याने ते आले नाहीत. त्याचा दुसरा काहीही अर्थ नाही, असे सांगत फडणवीस यांनी नाराजीच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तब्बल चाळीस मिनिटे त्यांची चर्चा झाली.
शिवसेनेला अतिरिक्त
खाते देण्याची तयारी
भाजपकडून शिंदे यांना १२ मंत्रिपदाचा व पूर्वी शिवसेनेकडे असलेल्य खात्याव्यातिरिक्त आणखी सार्वजनिक बांधकाम व जलसंधारण ही अतिरिक्त खाती देण्याची तयारी दर्शवली असल्याचे समजते. शिंदे मात्र गृहखाते मिळणार नसेल तर महसूल खाते मिळावे व आणखी दोन मंत्रीपदावर ठाम असल्याचे समजते. बावनकुळे यांच्यामार्फत भाजपाने अंतिम प्रस्ताव पाठवला असून शिंदे यांना उद्यापर्यंत त्याबाबत निर्णय कळवण्यास सांगितले आहे.
भाजपचा सूचक इशारा!
शिंदे यांनी शुक्रवारी दुपारपर्यंत तोडगा काढावा. तोडगा निघाला नाही तर पुढे जावे लागेल, असा सूचक इशारा भाजपाकडून देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून, शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.