पूर्णा : प्रतिनिधी
गोदावरी नदी पात्रात दिवसाढवळ्या अवैधरित्या विनापरवाना वाळू उपसा करण्यासाठी एक मोठी बोट व त्यासोबत एक मोठा तराफा सोडून वाळू उपसा सुरू होता. या ठिकाणावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.समाधान पाटील व महसूल प्रशासनाचे प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा, ताडकळस व पालम पोलिस व महसूल पथकाने दि.१८ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात ५ लाख रुपये किंमतीची बोट व २ लाख रुपये किंमतीचा तराफा असा ७ सात रुपये किंमतीचे साहीत्य नष्ट केले आहे.
पूर्णा तालुक्यातुन वाहणा-या गोदावरी व पूर्णा नद्यांचे पात्र तुडुंब भरलेले असल्याने अनेक ठिकाणी वाळू उपसा सहजासहजी करता येत नसल्याने वाळू उपसा करण्यासाठी तस्करांनी नाना क्लुप्त्या लढवलेल्या आहेत. नदीपात्रामध्ये मोटार पाईप नाव असलेली बोट तसेच लाखो रुपये किमतीचे तराफे सोडून बिन्नी ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा करत आहेत. दि.१८ जानेवारी रोजी पूर्णा तालुक्यातील मुंबर शिवारात गोदावरी नदी पात्रात काही वाळू तस्कर तराफा व बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करत असल्याची माहिती तहसीलदार माधवराव भुतेकर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांना मिळाली.
डॉ. समाधान पाटील व नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पालम पोलीस निरीक्षक थोरात, ताडकळस ठाणेदार गजानन मोरे, तलाठी सिद्धोधन खिल्लारे, नंदकुमार शेलाटे, पोकॉ. पांडुरंग वाघ यांच्या पथकाने दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नगरपरिषदेच्या बोटीच्या सहाय्याने नदीपात्रातुन घटनास्थळ गाठले. मुंबर शिवारातील गोदापत्रात मधोमध एक भलीमोठी बोट व त्यासोबत एक भला मोठा तराफाद्वारे वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी छापा घातला. महसूल व पोलीस पथकाला पाहताच वाळू उपसा करणारे तस्कर घटनास्थळावरून पसार झाले.
पोलीस व महसूल पथकाने नदीपात्रातून सुमारे ५ लाख रुपये किमतीची बोट व २ लाख रुपये किमतीचा तराफा जप्त केला. जप्त केलेला मुद्देमाल नदीकाठी आणून जिलेटिंग कांड्याच्या सहाय्याने हे साहित्य नष्ट केले. यावेळी घटनास्थळावरून ५ ते १० ब्रास वाळूसाठाही पथकाने जप्त केल्याचे समजते.