हनोई : वृत्तसंस्था
जगात काही अशी ठिकाणं आहेत, जी खास कारणासाठी ओळखली जातात. काही ठिकाणं त्याच्या सौंदर्यामुळे ओळखली जातात. परंतु एक सोनेरी हॉटेल सध्या चर्चेत आले आहे. या आलिशान हॉटेलमधील प्रत्येक वस्तू सोन्याने मढविण्यात आली आहे.
व्हिएतनामची राजधानी हनोई येथे हे हॉटेल सुरू करण्यात आले असून येथील प्रत्येक वस्तू सोनेरी आहे. या हॉटेलचे दरवाजे, खिडक्या, फर्निचर, नळ, टॉयलेट समवेत प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीत सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या हॉटेलात ग्राहकांना राजा-महाराजा असल्याचे फील्ािंग मिळणार आहे, कारण या हॉटेलमध्ये खाण्यासाठीची भांडीही सोन्याने निर्माण करण्यात आली आहेत.
हनोई येथे डोल्से हनोई गोल्डन लेक नावाचे हॉटेल आहे. एकूण २५ मजली या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एकूण ४०० खोल्या आहेत. या हॉटेलच्या बाहेरील भिंतींवरही ५४ हजार चौरस फुटात गोल्ड प्लेटेड टाइल्स लावण्यात आल्या आहेत. लॉबीपासून फर्निचर आणि सजावटीच्या सामग्रीवरही सोन्याद्वारे नक्षीकाम करण्यात आले आहे. कर्मचा-यांचा ड्रेस कोड देखील रेड आणि गोल्डन ठेवण्यात आला आहे.
येथील खोल्यांमधील फर्निचर आणि सामग्रीवरही सोन्याचे आच्छादन देण्यात आले आहे. बाथटब, सिंक, शॉवरपासून सर्व एक्सेसरीज देखील सोन्याने निर्माण करण्यात आली आहेत. हॉटेलच्या छतावर निर्मित इंफिनिटी पूल बाहेरील भिंतही गोल्ड प्लेटेड विटांनी निर्माण करण्यात आली आहे. डोल्से हनोई गोल्डन लेकमध्ये रुम्सचे प्रारंभिक भाडे सुमारे २० हजार रुपये आहे. तर डबल बेडरुम सुइटमध्ये एक रात्री वास्तव्यासाठी ७५ हजार रुपये खर्च करावे लागतात.