नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मिळून राहणे आणि आपापसात भांडण करणे कुणासाठीच योग्य नाही. हिंदुस्थानमध्ये मुस्लिम राहता कामा नयेत आणि पाकिस्तानमध्ये हिंदू राहता कामा नयेत, असे माझे म्हणणे आहे. आम्ही याबाबतीत मोहम्मद अली जिन्नांशी सहमत आहोत. दोन्ही धर्माच्या लोकांनी आपापल्या वसाहतींमध्ये राहिलं पाहिजे. सर्वच धर्माच्या लोकांची सहमती असती तर भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे झाले नसते. तेव्हा अनेक प्रयत्न झाले परंतु लोक सहमत झाले नाहीत. त्यामुळे एका ठिकाणी एकसारखे लोक रहायला गेले, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने ज्या समान नागरी कायद्याला २०२४च्या निवडणुकीमध्ये निवडणूक अजेंडा बनवला, त्यावरुन उत्तराखंडच्या ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी वरील विधान केलं आहे.
‘न्यूजतक’सोबत बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, समानतेची गोष्ट ऐकायला बरी वाटते. पण माझं म्हणणं असं आहे की, आपण सगळ्यांनाच समान करण्याचा प्रयत्न केला तर कुणालातरी तोडून छोटं करावं लागेल नाहीतर कुणाला जॅक लावून उंच करावं लागेल. तेव्हाच सगळे समान होतील.. पण अशी समानता शक्य नाही.
शंकराचार्य पुढे म्हणाले की, आपल्याला पर्सनल लॉ नियमाप्रमाणे जीवन जगण्याची मुभा पाहिजे. जसं मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे लोक नियम पाळतात तसंच आपल्यालाही असाच कायदा गरजेचा आहे. मला यूसीसी अजिबात मान्य नाही, आधीच धर्मामध्ये खूप जास्त हस्तक्षेप झालेला आहे.