राज्यपाल नियुक्त आमदार येणार गोत्यात?
मुंबई : प्रतिनिधी
भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असल्यापासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय अखेर काल मार्गी लागला. महायुतीकडून ७ जणांचा शपथविधी झाला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी त्यांना शपथ दिली. आता या सोहळ््याच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. आचारसंहिता लागू होण्यास काही तास राहिलेले असताना हा शपथविधी उरकला. मुळात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यातच मुंबई हायकोर्टाने हस्तक्षेपास नकार दिला. परंतु अंतिम निर्णयाच्या वेळी हे प्रकरण निर्णयाधीन राहील, असे कोर्टाने म्हटले. त्यामुळे या आमदारांवर टांगती तलवार कायम आहे.
आमदारांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात यावी, या मागणीसाठी ठाकरेसेनेच्या नेत्याने न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. या नियुक्त्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या आधीन असतील, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे या ७ आमदारांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंह महाराज राठोड, शिंदेसेनेकडून हेमंत पाटील, मनिषा कायंदे, अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली.
या प्रकरणात राज्य सरकारकडून महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नव्हती किंवा राज्य सरकारनेही आमदारांची नियुक्ती न करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिलेले नव्हते. त्यामुळे सरकारने १२ पैकी ७ आमदारांची नियुक्ती केली आहे, असा युक्तिवाद केला. आता यावर कोर्ट काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे.