नवी दिल्ली : प्रतिनिधी
राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आज (१८ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भगवे डाळिंब भेट दिले. या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान, १७ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतरही या भेटीची मोठी चर्चा झाली होती. भगव्या डाळिंबाआड भविष्यातील राजकीय समीकरणे आखली जात आहेत का, हे लवकरच कळेल.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीविषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. या भेटीदरम्यान शरद पवार साता-याच्या फलटण तालुक्यातील दोन शेतक-यांना सोबत घेऊन गेले होते. या शेतक-यांनी मोदींना त्यांच्या शेतातील डाळिंब भेट म्हणून दिली. राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी शेतक-यांच्या समुहासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
आता भगव्या डाळिबांची राजधानी दिल्लीत चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. भगवं डाळींब देण्यामागे शरद पवारांचा काय उद्देश यातून काय संकेत दिले जाताहेत. शरद पवार पण भगव्या रंगाकडे आकर्षित झाले आहेत? शिवाय शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही राजकीय जवळीक ठरणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारीला अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन पार पडत आहे. त्यापूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी पवार तिथे गेले होते. शरद पवार मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यासाठी शरद पवार यांनी मोदी यांची भेट घेतली होती.