लातूर : प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण, संवर्धन व पाण्याची बचत’ या अभियान अंतर्गत महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ग्रीन क्लबच्या माध्यमातून बेस्ट फ्रॉम वेस्ट हा उपक्रम घेण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी सहभागी व उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. गव्हाणे म्हणाले की, आशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना स्वत:चा छोटासा उद्योग सुरू करता येऊ शकतो. त्यातून उद्योजक निर्माण होऊ शकतात. निरुपयोगी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, पर्यावरणपूरक व शोभेच्या वस्तू तयार करता येतात. असे प्राचार्य डॉ. गव्हाणे यांनी सांगितले. या उपक्रमात महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या टाकाऊ वस्तूपासून उदा. काच, नारळाच्या करवंट्या, कपडे, कापडी पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या,
प्लास्टिकचे डबे, रद्दी वर्तमानपत्र, वाह्यांचे कागद, युज अँड थ्रो पेन, धातूच्या तारा, ड्रायफ्रूटची टरफले, प्लास्टिक कॅरीबॅग, चहाचे कागदी कप अशा टाकाऊ साहित्याचा वापर करून टिकाऊ, आकर्षक आणि जीवन उपयोगी वस्तू तयार करून सादर केल्या. यामधून पर्यावरणात टाकाऊ पदार्थांपासून होणारे प्रदूषण टाळणे, पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करणे हा मुख्य संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचा उद्देश होता.
या सोबतच या टाकाऊ पदार्थांपासून आकर्षक आणि उपयोगी वस्तू बनविल्यास आपल्या घरामध्ये शोभेच्या वस्तू विकत आणण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यातून पैशाची बचत होऊ शकते, व एक उद्योगही उभा राहू शकतो, हा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला भेट देण्यासाठी लातूर शहरातील पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी सतत कार्यरत असणारे सुपर्ण जगताप यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तर परीक्षक म्हणून डॉ. चंद्रशेखर दवणे, डॉ. अर्चना टाक आणि डॉ. बुध्दाजी गाडेकर यांनी काम पाहिले.
या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, कदअउ समन्वयक, परीक्षानियंत्रक, व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेट देवून सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी ग्रीन क्लब समन्वयक डॉ. किशोर शिंदे व ग्रीन क्लबचे अध्यक्ष रत्नदीप भुरे, उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. उपक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.