मुंबई : ४ जून रोजी देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालातून महाराष्ट्राच्या जनतेने फोडाफोडीच्या राजकारणाला पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या निकालानंतर आता राजकीय वर्तुळातील घडामोडींचा वेग वाढला आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेतील अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात लवकरच मोठा भूकंप होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात शिंदे गटाला एकूण सात जागा मिळाल्या आहेत. यातील सातपैकी निम्म्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे भारतात आघाडी सरकार स्थापन करण्याच्या मार्गावर आहेत. यात उद्धव ठाकरे गटाचा महाराष्ट्रातील निकाल पाहता शिंदे गटाच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे पुढे जाऊन हे नेते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येतील अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात सर्वांत कमी जागा मिळाल्या आहेत. यातील भाजपला ९, शिवसेनेला ७ तर राष्ट्रवादीला फक्त १ जागा मिळाली आहे. परंतु शिवसेनेचे सातही खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. तर दुस-या बाजूला, महाविकास आघाडीने महाराष्ट्रात तब्बल ३० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी महायुतीवर भारी पडली असल्याचे चित्र कालच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.