मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ४५ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गजांसह राजकीय घराण्याची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची देखील नावे आहेत.
शिंदे कोपरी पाचपाखाडी या आपल्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
अशातच शिंदे गटाच्या यादीत राजकीय घराण्यातील किती उमेदवारांचा समावेश आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
घराणेशाहीचा ठसा असलेल्या उमेदवारांची यादी
१. चिमनराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे.
२. माजी खासदार आनंदराव अडसुळ यांचे पुत्र अभिजीत अडसुल यांना तिकीट मिळाले आहे.
३. पैठण मतदारसंघातून खासदार संदीपन भूमरे यांचे पुत्र विकास भूमरे यांना उमेदवारी मिळाली आहे.
४. जोगेश्वरी (पूर्व) मतदारसंघातून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना तिकीट देण्यात आले आहे.
५. राजापूर मतदारसंघातून मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना तिकीट मिळाले आहे.
६. खानापूर मतदारसंघातून दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना तिकीट देण्यात आले आहे.
शिांदे गटाने माहिम मतदारसंघातून सदानंद शंकर सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवणार आहेत.
या यादीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, बंडखोरीच्या वेळी शिंदे यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांचे आणि मंर्त्यांना विधानसभेसाठी संधी देण्यात आली आहे. तसेच नव्या चेह-यांसह काही अपक्ष उमेदवारांनाही यादीत स्थान देण्यात आले आहे.