32.4 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत कलह

शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत कलह

पुणे : प्रतिनिधी
नुकतीच पुण्यात संवाद बैठक पार पडल्यानंतर शिवसेनेतील पदाधिका-यांनी त्यांची नाराजी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून व्यक्त केली आहे. पुण्यात २ दिवसांपूर्वी संपर्क नेते उदय सामंत यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली बैठक पार पडली होती. या बैठकीत गुपचुप वरिष्ठांशी बोलून निधी घेतात, सगळ्यांनी आपलं दुकान मांडलंय, स्वार्थाची पोळी भाजणं बंद केलं पाहिजे अशी चर्चा पुण्यातील शिवसेना पदाधिका-यांच्या ग्रुपमध्ये होत असल्याने शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत कलह असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, पुणे येथे शिंदेंच्या शिवसेना पदाधिका-यांची बैठक झाली. या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, आमदार विजय शिवतारे, आमदार शरद सोनवणे, नुकताच पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते.

पुण्यात ‘शिवसेना कार्यालय पुणे शहर’ नावाचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. ज्यामध्ये पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकारी आहेत. संवाद बैठक पार पडल्यानंतर रात्री एका पदाधिका-याने ‘स्वार्थासाठी पक्षात आलेल्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना धमकी देऊ नये, नवीन आले म्हणजे फार काही पराक्रम केला नाही….’, असा भला मोठा मेसेज त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केला. या मेसेजला रिप्लाय म्हणा किंवा संधी शोधणे म्हणा, आणखी एका पदाधिका-याने आमचे गा-हाणे सांगायचे कोणाला? आपला सत्तेत राहून उपयोग काय.. असा मेसेज केला.

कालचा संवाद मेळावा हा कार्यकर्त्यांशी झाला, परंतु कार्यकर्त्याला बोलायला दिले गेले नाही, अशी व्यथा एकाने ग्रुपवर व्यक्त केली. यात आणखी एका कार्यकर्त्याने उडी घेतली आणि त्याने, जो तो आपली कातडी वाचवतो. गुपचुप वरिष्ठांना गोड बोलून निधी घेतात, काम करून घेतात असा आरोप सुद्धा केला. ‘बाळासाहेब असताना पुण्यात २१ नगरसेवक होते, आता वीस वर्षांत फक्त २ नगरसेवक राहिले. हे सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणार नाहीत, यांना त्यांच्या मर्जीतले लोक लागतात, ख-या कार्यकर्त्याला शेवटपर्यंत न्याय भेटत नाही’ अशी खंत एका कार्यकर्त्याने ग्रुपवरच मांडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR