26.2 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदेंना मी मुख्यमंत्री केले

शिंदेंना मी मुख्यमंत्री केले

सिल्लोड : प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपला घरचा आहेर दिला आहे, तसेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे, सोबतच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. मला मुख्यमंत्री बदलण्याचा अनुभव आहे व शिंदेंना मीच मुख्यमंत्री केले असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे मतदान जवळ येत आहे.

राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी चांगलाच जोर पकडला आहे, यातच शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी भाजपचे लोक खडखड करत आहेत, त्यांच्यासाठी मी म्हणालो की आम्ही मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो कारण मी गुवाहाटीला गेलो, बिर्याणी खाल्ली आणि मुख्यमंत्री बदलला. एका शेतक-याच्या मुलाला मी मुख्यमंत्री केले, मला मुख्यमंत्री बदलण्याचा अनुभव आहे. मी हिंदुत्ववादी असलेल्या एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केले, एमआयएमचा मुख्यमंत्री केला नाही. आम्ही बंड केले नसते तर भाजपचे लोक सत्तेत आले असते का? आणि पुढचे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदेच होणार असे सत्तार यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. रावसाहेब दानवे यांनी या निवडणुकीत मला मदत केली असती तर मला प्रचार करण्याची गरज पडली नसती. राजकारणात लपूनछपून काम करणा-या लोकांचे काय हाल होतात हे त्यांनी लोकसभेमध्ये पाहिले आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरे यांची जी सभा आहे, ती शिवसेनेची आहे की भाजपची हे कळत नाही. उद्धव ठाकरे येत आहेत त्यांचे मी स्वागत करतो, मात्र एक लाख वीस हजार मतांनी माझाच विजय होईल, असे सत्तार यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR