22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले असले तरी भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपची बरीच पीछेहाट झाली आहे. दरम्यान राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केले जाणार आहे.

राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. याच महायुतीतील शिंदे सरकारच्या एका नेत्यानेही दावा केला असून कॅबिनेटचा विस्तार राज्यात करावाच लागेल असे म्हटले आहे. शिंदे सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे.

कॅबिनेटचा विस्तार महाराष्ट्रात करावाच लागेल, एक लिमिट असते. तुम्ही पूर्ण कॅबिनेट बनवू शकले नाहीत हा शिक्का राहील, त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा हा विस्तार होईल. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ग्रीन सिग्नल दिला असेही शिरसाट म्हणाले. आज भाजपची अंतर्गत बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातली भाजपच्या पराभवाची कारणं शोधली जाणार असून मंत्रिमंडळविस्तारासंदर्भातही चर्चा होणार आहे, असे समजते. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्याच्या मंत्रिमंडळात विस्तार होणार आहे, असे वृत्त आहे.
यांसदर्भातच संजय शिरसाट यांनीही भाष्य करत लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनीही ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा केला आहे.

सरकारला कोणताही धोका नाही
लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएला बहुमत मिळाले असून आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही दलांच्या बैठकांचा जोर दिल्लीत सुरू झाला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी घाई सुरू झाली आहे. या मुद्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. एनडीएचे सरकार स्थापन व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेऊन आपण सरकार बनवू असं काहींना वाटू लागलंय. पण सरकारला कोणताच धोका नाही, २६ पक्षांपेक्षा या चार पक्षांचे सरकार केव्हाही चांगले. ‘इंडिया’ सरकार बनवेल असे वाटत नाही. १० तारखेच्या आत एनडीए सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितीश कुमार इंडिया आघाडीत जाणार नाहीत असे सांगत संजय राऊत लालूच देण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

ओव्हर कॉन्फिडन्सचा फटका बसला
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला केवळ अवघ्या १७ जागा मिळाल्या, भाजपचीही पीछेहाट झाली. याची कारणमीमांसा करताना संजय शिरसाट यांनी आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्सचा फटका बसल्याचे स्पष्ट मत मांडले. सर्व्हे, जागावाटपात दिरंगाई झाली त्याचाही फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. ग्राऊंड लेव्हलला कार्यकर्त्याला महत्त्व देणे गरजेचे असून ज्या गोष्टी राहिल्या त्यांची उणीव विधानसभेत भरून काढू असे शिरसाट यांनी सांगितले. सतराचा खतरा वाटत नाही, ताक फुंकून पिऊ, दूध गरम होतं आम्ही ताक समजून पीत होतो. पण मतदारांना गृहीत धरणे चुकीचे आहे, मतदार जागा दाखवतो, असे शिरसाट म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR