सोलापूर : महापालिका कार्यक्षेत्रात कार्यात असणाऱ्या महापालिका शाळेतील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी महापालिका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने महापालिका उपायुक्त तैमूर मुलाणी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
महापालिका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्तांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी उपायुक्त मुलाणी यांनी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा केली.
शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नती मिळावी, विज्ञान व भाषा पदवीधर शिक्षकांचीनियुक्ती करण्यात यावी, शिक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात याव्यात, बीएस्सी शिकत असलेल्या शिक्षकांना विज्ञान पदवीधर म्हणून नियुक्ती करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. महापालिका शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी शिक्षकांनी महापालिका शाळेतील विद्यार्थी पट वाढविण्याबाबत, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी पालकांची, समाजातील विविध घटकांची तसेच एनजीओची मदत घ्यावी व ज्या ठिकाणी महापालिकेचे अधिकाऱ्यांची आवश्यकता असेल, त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष उपस्थित राहतील, अशी सूचना केली. त्यामुळे शिक्षकांनी प्रश्नांबरोबर शाळेच्या गुणवत्ता, पट वाढीसाठी अधिक प्रयत्न करावे, अशी अपेक्षा उपायुक्त मुलाणी यांनी व्यक्त केली. यावेळी महापालिका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक अमोल भोसले, सहनिमंत्रक इम्रान पठाण, मार्गदर्शक नागेश गोसावी, फजल शेख, संघटक कृष्ण सुतार, विशाल मनाळे, विजय टेकाळे, केशव गलगले, मौला जमादार आदी उपस्थितीत होते.