शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यात सोमवारी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे उजेड नाल्याला पूर आला तर शहराजवळील घरणी नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने उदगीर रस्त्यावरील अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला असून या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील शिरूर अनंतपाळ व हिसामाबाद महसुल मंडळात तब्बल ८७.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात सोमवारी दुपार पासून संपूर्ण रात्रभर पावसाने जोरदार बॅटींग केली.या पावसाने पेरणीसाठी तयार केलेली शेतजमीन वाहून गेली तर नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. पहिल्याच पावसाने तालुक्यातील पाण्याचे स्रोत प्रवाहित झाल्याने शेतक-यासह नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान शिरूर अनंतपाळ शहराजवळ उदगीर रोडवरील घरणी नदीवरील सध्या पुलाचे काम सुरू आहे. यामुळे वाहतुकीसाठी पाईपवर भराव टाकून पर्यायी पूल तयार करण्यात आला होता मात्र घरणी प्रकल्पाखाली मुसळधार पाऊस पडल्याने घरणी नदी ओसंडून वाहू लागली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने घरणी नदीवरील पर्यायी पुल वाहून गेला. हा पूल वाहून गेल्यामुळे शिरूर अनंतपाळ ते उदगीर हा राज्यमार्ग बंद पडला असल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. हा पर्यायी पुल तात्काळ दुरूस्त करून गैरसोय टाळावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.