मुंबई : प्रतिनिधी
येवल्यात रविवारी रात्री घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. शिवरायांच्या पुतळ्यासमोर झालेली शिवीगाळ माझ्या मनाला पटली नाही. शिवरायांच्या समोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे हे मनाला दु:ख देणारे होते.
तेथे गोंधळ झाल्यावर पोलिसांनी मुख्य दरवाजा बंद करून घेतला, मात्र काही लोकांनी शिवरायांच्या वास्तूच्या द्वाराला लाथा मारल्या. माझ्या मनाला खूप दु:ख झाले, अशी भावुक प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक रविवारी रात्री येवल्यात आले होते. त्यावेळी शिवसृष्टीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जरांगे आणि त्यांच्या समर्थकांची भुजबळ समर्थकांबरोबर बाचाबाची झाली. याच घटनेवर छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी मनोज जरांगे समर्थकांबद्दल बोलताना नाराजी व्यक्त केली.
भुजबळ म्हणाले, बाबा सिद्धिकी यांच्या दफनविधीच्या कार्यक्रमाला आम्ही काल होतो. मला येवल्यातून कळालेल्या माहितीनुसार काहींनी शिवरायांच्या समोर अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली. हे मनाला खूपच दु:ख देणारे होते. जरांगे आणि त्यांचे सहकारी काल मुक्तिदिन असल्याने येवल्यात आले होते. शनि पटांगणावर त्यांचे भाषण होणार होते. परंतु काही लोकांनी सांगितले की शिवसृष्टीचे दर्शन घेऊन येऊ. त्यांनंतर त्यांनी शिवरायांचे दर्शन घेतले.
परंतु त्यानंतर आमचे स्थानिक कार्यकर्ते तिथे गेल्यानंतर जरांगे यांच्या समर्थकांनी शिवीगाळ करायला सुरूवात केली. आपण ज्यावेळी शिवसृष्टीचे उद्घाटन केले त्यावेळीपासून लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तिथे लोक असतात. खरे तर ते स्वयंसेवक आहेत. तेथे शिवकालिन शस्त्र ठेवलेली आहेत, त्यामुळे तिथे काही लोक असतात. त्या लोकांनाच जरांगे यांच्या समर्थकांनी शिविगाळ केली.
थोडीशी बाचाबाची झाल्यावर काहींनी अनेकांना फोन करून बोलावून घेतले. आमचे लोक आतमध्ये देखरेखीसाठी होते. गोंधळ उडाल्यावर पोलिसांनी किल्ल्याचे मुख्य द्वार बंद करून घेतले. पोलिसांची कृती पाहून काही लोकांनी त्यावर लाथा मारायला सुरूवात केली. त्यातील एक जण सांगत होता, महाराजांच्या वास्तूवर लाथा मारणे योग्य नाही. मग त्यातील एकाने सांगितले, भुजबळांचे बॅनर्स आणि पोस्टर्स फाडून टाका. त्यांच्यातील काहींनी लगेच पोस्टर फाडायला सुरुवात केली. त्यांच्या हे ही लक्षात आले नाही की फ्लेक्सवर शिवाजी महाराजांचे फोटो होते. काही लोक निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, त्यांनी हा पराक्रम केल्याचे मला कळले आहे, असे भुजबळ म्हणाले.
मनोज जरांगे काही बोलले नाहीत, हे ही खरे
माझ्या नावाने शिवछत्रपतींच्या प्रांगणात दंगा का करावा? शिवछत्रपतींच्या इतिहासाद्दल गोंधळ करणा-यांना काय माहिती आहे, हा मला प्रश्न आहे. पण यात मनोज जरांगे काही बोलले नाहीत, हे ही खरी गोष्ट आहे. त्यांचे समर्थक मात्र आक्रमक होते. त्यामुळे तिथे कोण काय करीत होते, हे पोलिसांना अधिक माहिती आहे, असेही भुजबळ म्हणाले.
आमचे लोक कशाला शिवीगाळ करतील?
जरांगे यांच्या समर्थकांचा आरोप होता की तुमच्या कार्यकर्त्यांनी आधी शिवीगाळ केली या आरोपावर भुजबळ म्हणाले, शिवसृष्टीची देखभाल करण्यासाठी आम्ही काही लोक ठेवले आहेत. ते कशाला शिवीगाळ करतील? शिवसृष्टी पाहण्यासाठी लाखो लोक येऊन गेले. ते आजपर्यंत कुणाला कधीही बोलले नाहीत. त्यांनी एवढे सांगितले की भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी द्यायची आहे तर बाहेर जाऊन द्या, इथे देऊ नका…