कोलकात्ता : वृत्तसंस्था
तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जे घडले त्याचीच पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये होणार की काय, अशी राजकीय घडामोड घडू लागली आहे. तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यात शीत युद्ध सुरु झाले असून तृणमूल कॉँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे वृत्त आहे.
अभिषेक बॅनर्जी व तृणमुलच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून पक्षात काही आलबेल नसल्याचे सांगितले जात आहे. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यात निर्माण झालेले मतभेद कधीही न संपण्याच्या टप्प्यात जाऊन पोहोचल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
ममता बॅनर्जी यांच्यानंतर पक्षात अभिषेक हे दुस-या क्रमांकाचे नेते आहेत. कलाकारांवर टाकलेल्या बहिष्कारावर ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. कोलकाताच्या आरजी कर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात ज्या कलाकारांनी ममता सरकारविरोधात टीका केली त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तृणमुलने घेतला आहे. यास अभिषेक यांचा विरोध आहे. नववर्षाच्या स्वागताला गायिका लग्नजीता चक्रवर्ती हिचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. परंतू, कोलकाताच्या स्थानिक नगरसेवकाने हा कार्यक्रम रद्द करत सरकारविरोधात बोललेल्या कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका स्पष्ट केली होती. यावरून हा वाद सुरु झाला आहे.
अभिषेक यांच्या भूमिकेलाही अनेक नेत्यांचा पाठिंबा आहे. यामुळे आता ममता बॅनर्जी आणि पुतण्यात पक्षांतर्गत वर्चस्वावरून कोल्ड वॉर सुरु झाल्याची चर्चा होत आहे.