छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी-माजी मंत्र्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. माजी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. जाहीर सभेत संजय शिरसाट यांनी सत्तार यांचा समाचार घेतला. आता अब्दुल सत्तार शिरसाट यांची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि माजी पालकमंत्री सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील वाद आता वाढत चालला आहे. सोमवारी संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये झालेल्या नागरी सत्काराच्या वेळेस संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्याबद्दल आता अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहेत.
अब्दुल सत्तार म्हणाले, ही बाब एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकणार आहे. सध्या मी माध्यमांशी बोलणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांना याबद्दल सांगणार आहे. त्यानंतर मग ते जे म्हणतील त्यानुसार मी पाऊल टाकणार आहे.
काहींच्या पोटात दुखतंय : संजय शिरसाट
कपटकारस्थान करणा-या माणसाने व्हॉईस चॅट शिंदेंना दाखवत मला मंत्री कसे करू नये असे प्रयत्न झाले. मंत्रिपदाची शपथ घेताना हात लटपट कापत होते. मी मंत्री झालो त्यामुळे काही जणांच्या पोटात दुखत होते. निवडणुकीच्या काळात मी टेन्शन घेत नाही पण करेक्ट कार्यक्रम करतो. या निवडणुकीत पैसे जास्त लागले पण मीही मोकळा हात केला, असे शिरसाट म्हणाले.