नाशिक : विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला चांगला कौल दिला आहे. त्यामुळे राज्यात आता महायुतीचे एकहाती सरकार येणार हे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत महायुतीला २३० जागा मिळाल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त असल्याचे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.
राज्यात सध्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहेत तर भाजप शिंदेंच्या सेनेला गृहमंत्रिपद द्यायला तयार नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त खाती मिळणार की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला याबाबतच्या चर्चा सुरू असतानाच भुजबळांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कारण नुकतेच दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांना सोबत घेतले नसते तर आमच्या शंभर जागा निवडून आल्या असत्या, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शाब्दिक चकमक सुरू होती. अशातच आता भुजबळांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
छगन भुजबळ म्हणाले, शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अजित पवार गटाचा स्ट्राईक रेट जास्त आहे. स्ट्राईकरेटनुसार आम्ही २ नंबरवर आहोत. अजित दादांसोबत आमची बैठक झाली तेव्हा स्ट्राईक रेटचा विषय झाला. राज्यात एक नंबर भाजप आहे तर दोन नंबरला आम्ही आहोत. मंत्रिमंडळात नवीन चेह-यांना संधी नेहमी देण्यात येते. मात्र, यावेळी जरा अडचण जास्त आहे. कारण दरवेळी १६० आमदार असतात, यावेळी आमदारांची संख्या जास्त आहे. सर्व पक्षांमध्ये नवीन-जुने चेहरे येतील.