दादर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमध्ये कुठे, कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळेत प्रचार सभा घ्यायच्या याचे नियोजन सुरु झाले आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा १८ नोव्हेंबर २०२४ रोजी थंडावतात. त्याआधी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी शेवटचा रविवार आहे. त्यामुळे या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या सभा पाहायला मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दादरच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवाजी पार्क मैदानासाठी चार पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप आणि मनसे या चार पक्षांमध्ये शिवाजी पार्क मैदान प्रचारासाठी मिळावे यासाठी चुरस रंगली आहे. या चारही पक्षांकडून १७ नोव्हेंबरसाठी अर्ज दाखल करण्यात आला. १८ नोव्हेंबरला प्रचार तोफा थंडावत असल्याने १७ नोव्हेंबरला मैदान मिळावं, यासाठी चढाओढ सुरु आहे. या मैदानासाठी सर्वात पहिल्यांदा अर्ज मनसेकडून आला, त्यामुळे मनसेच्या सभेला परवानगी मिळावी, अशी मागणी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.
‘येत्या १८ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावत आहेत. त्यामुळे १७ नोव्हेंबरला संध्याकाळी सभा घेण्यासाठी आम्ही शिवाजी पार्क मैदान आरक्षित करण्यासाठी अर्ज दिला आहे. १७ नोव्हेंबरला इतर तीन पक्षांनी देखील महापालिकेकडे अर्ज केला आहे. जेव्हा एकाच दिवसासाठी आणि एकाच ठिकाणासाठी अनेक पक्ष अर्ज देतात, तेव्हा प्रथम अर्ज देणा-यांना प्राधान्य दिले जाते आणि आमचा अर्ज सर्वात प्रथम देण्यात आला होता. नेहमीप्रमाणे आमचा अर्ज पहिला आलेला आहे. त्यामुळे हे मैदान सभेसाठी आम्हालाच मिळणार’, असे यशवंत किल्लेदार म्हणाले.
‘‘शिवाजी पार्क मैदान हे मुंबईचे मध्यवर्ती मैदान असून याला ऐतिहासिक वारसा आहे. या मैदानाचा राजकीय वारसा बाळासाहेबांमुळे तयार झाला आहे, तो मान्य करावा लागेल. शिवाजी पार्क येथे होणा-या सभेचा इम्पॅक्ट संपूर्ण महाराष्ट्रावर पडतो. त्यामुळे सर्वच पक्षांना असं वाटतं की आपली सभा शिवाजी पार्क मैदानात झाली पाहिजे’’, असेही यशवंत किल्लेदार यांनी म्हटले.