लातूर, धाराशिव, सोलापूर, माढ्याचा समावेश
१२ राज्यांतील ९४ जागांसाठी मतदान, राज्यातील ११ जागांचा समावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीचे तिस-या टप्प्यातील मतदान येत्या ७ मे रोजी होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. तिस-या टप्प्यात १२ राज्यांतील ९४ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे.
राज्यातील बारामती, रायगड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी—सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. १२ राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ९४ जागांसाठीची अधिसूचना शुक्रवार काढली जाणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. मध्य प्रदेशातील बैतूल मतदारसंघात तिस-या टप्प्यात मतदान होणार होते. तथापि याठिकाणी अर्ज भरलेल्या बसपाच्या उमेदवाराचे निधन झाल्याने या ठिकाणचे मतदान तिस-या टप्प्यात घेतले जाणार आहे. याबाबत वेगळी अधिसूचना शुक्रवारी काढली जाणार असल्याची माहितीही आयोगाने दिली.
तिस-या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल असून २० एप्रिलला अर्जांची छाननी केली जाईल. २२ एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ जागांसोबत गुजरातमधील २६, कर्नाटकमधील १४, उत्तर प्रदेशातील १०, मध्य प्रदेशातील ८, छत्तीसगडमधील ७, बिहारमधील ५, आसाम आणि प. बंगालमधील प्रत्येकी ४, गोवा राज्यातील २, दादरा नगर हवेली, दमन आणि दीवमधील २ व जम्मू-काश्मीरमधील एका जागेवर मतदान होणार आहे.