27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रशेट्टींची नाराजी; फडणवीस घरी

शेट्टींची नाराजी; फडणवीस घरी

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकिट कापलेले भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी नाराज असल्याचे बोलले जात आहे. शेट्टींची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेले होते. गोपाळ शेट्टी यांच्या बोरिवलीतील निवासस्थानी दोघांची भेट झाली. फडणवीसांना शेट्टींचे मन वळवण्यात यश आले आहे का, गोपाळ शेट्टींची पुढील भूमिका काय असणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भाजपने काल लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने पीयूष गोयल यांना तिकिट दिले आहे. दोन वेळा खासदार राहिलेल्या गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कापून गोयल यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शेट्टींची विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी हुकली. पर्यायाने गोपाळ शेट्टी यांचे समर्थक नाराज झाले होते.

लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काल रात्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. शेट्टींच्या नाराजीचा गोयल यांना फटका बसू नये, यासाठी फडणवीसांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.

तुमचा योग्य तो मानसन्मान राखला जाईल असा शब्द फडणवीसांनी दिल्याचे बोलले जाते. आता शेट्टींचे पुनर्वसन कुठे आणि कसे होते, ते पाहणे उत्सुकतेचे आहे. त्यांची नाराजी दूर झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा खात्रीशीर मतदारसंघ मानला जातो. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खालोखाल सर्वाधिक मताधिक्य भाजपला उत्तर मुंबईतून मिळाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राम नाईक यांचे तिकिट कापत तत्कालीन आमदार गोपाळ शेट्टी यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. शेट्टींना काँग्रेसच्या हातून भाजपचा गड खेचून आणण्यात यश आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR