मंगळवेढा- उचेठाण येथे ट्रॅक्टरने शेतातील सामाईक रस्ता नांगरत असताना विरोध केल्याने जातीवाचक शिवीगाळ करून कुदळीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी १६ जणांविरुध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
हरिदास घोडके, संतोष कदम, संजय बेदरे, विजय बेदरे, पप्पू बेदरे, आण्णा साठे, आप्पा साठे, दादासाहेब बेदरे, प्रभाकर बेदरे, जमल बेदरे, ओंकार घोडके, वैभव घोडके, वैभव गडदे, सायाप्पा पटाप, राजू बेदरे व अन्य यांच्याविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादी अक्षय भास्कर बनसोडे यांना उचेठाण शिवारात ३० गुंठे शेतजमीन असून ते शेती कसून उपजीविका करतात.
फिर्यादी व त्यांचा भाऊ अमर व मित्र प्रताप सोनवले हे अशोक बाबर यांच्या मालकीच्या व करून खाण्यास दिलेल्या शेतात गेले असता त्या ठिकाणी हरिदास घोडके व अशोक बाबर यांचे शेतामधून असलेल्या सामाईक रस्ता हरिदास घोडके व अन्य आरोपी यांना सोबत घेऊन ट्रॅक्टर (एमएच. १३ बीआर ०८९९) व बिगर नंबर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रस्ता नांगरत असताना दिसले.यावेळी फिर्यादीने आरोपीला तुम्ही रस्ता का नांगरत आहात?
पहिल्यापासून या रस्त्याने आमची वहिवाट चालू आहे, तुम्ही रस्ता नांगरू नका असे सांगितले असता आरोपीने तुमची शेतजमीन विकत घेण्याची लायकी नाही तरी पण तुम्ही घेतली आहे. या रस्त्याने जायचे नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून आरोपीने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळ्यातील गमजा ओढून तेथे पडलेली कुदळ उचलून हाताच्या दंडावर मारुन जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान यावेळी मित्र व भाऊ भांडण सोडविण्यास आल्यानंतर त्यांनाही मारहाण केल्याचे नमूद केले आहे. दरम्यान गुन्हा दाखल होवूनही आरोपी अद्याप मोकाट असल्याचा आरोप फिर्यादीचा आहे. तपास डीवायएसपी विक्रांत गायकवाड हे करीत आहेत.