ठाणे : प्रतिनिधी
राज्यात महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पद कोणाकडे राहणार यावरुन सत्तास्थापनेला उशिर होत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून गृहमंत्रीपद आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद हवे असल्याची चर्चा देखील सुरु आहे. मात्र यावर आता शिंदे गटाकडूनच स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सत्तास्थापनेला आमच्यामुळे उशिर होत नाही, आम्ही उपमुख्यमंत्री पदाची मागणी केली नसल्याचे हे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला.
महायुतीमध्ये सत्तास्थापनेचा डेडलॉक निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे अशी शिंदे गटाची मागणी असल्याची चर्चा आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनाही या संबंधी विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी अजून चर्चा सुरु आहे. कोणाला कोणते मंत्रीपद मिळणार याची चर्चा पत्रकारांमध्येच अधिक आहे, असे सांगत त्यांनी श्रीकांत शिंदेंच्या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळले. मात्र आज सकाळपासून श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे यामुळेच सरकार स्थापनेला उशिर होत असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतेही पद मागितलेले नाही. त्यांना मंत्री व्हायचे असते तर ते केंद्र सरकारमध्येच मंत्री होऊ शकले असते. श्रीकांत शिंदे यांची खासदारकीची ही तिसरी टर्म आहे, त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले असते, असे म्हस्के यांनी म्हटले आहे. म्हस्के म्हणाले की, श्रीकांत शिंदे यांची खासदार म्हणून तिसरी टर्म आहे. त्यामुळे ते केंद्रात मंत्री झाले असते, असे म्हणत म्हस्केंनी श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद हवे या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. नरेश म्हस्के यांनी गृहमंत्री पदावर मात्र सोईस्कर मौन बाळगले.
गृहमंत्रीपद हे उपमुख्यमंत्र्यांकडे असते
गृहमंत्रीपदावरुन सत्तास्थापनेचा पेच अडला असल्याचे बोलले जात आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी थेट उत्तर दिले आहे. गृहमंत्रीपद हे उपमुख्यमंत्र्याकडे असते असे आजपर्यंतचे संकेत आहेत. महायुतीमध्ये शिंदे गटाकडे गृहमंत्रीपद राहिले तर ते इतर दोन्ही पक्षांसाठी देखील चांगले राहिले असे शिरसाट म्हणाले. त्यामुळे गृह खात्यावर शिंदे गटाने दावा सोडलेला नाही, असे त्यांनी अधोरेखीत केल्याचे मानले जात आहे.