अहमदनगर : श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अटक करण्यात आली आहे. मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. राहुरी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना श्रीरामपुरातील त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी ही माहिती दिली.
राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. मुरकुटे हे रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले. ते कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. रात्री साडेअकराच्या दरम्यान राहुरी पोलिस त्यांच्या निवासस्थानी आले. यानंतर त्यांची चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याची त्यांनी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, माजी आमदार मुरकुटे हे प्रदीर्घ काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत ते अलीकडच्या काळात भारत राष्ट्र समिती पक्षात दाखल झाले होते. आक्रमक कार्यशैलीसाठी ते ओळखले जातात. श्रीरामपूरच्या पाणीप्रश्नावरून तसेच अशोक कारखान्याच्या ऊस पळवापळवीच्या कारणातून त्यांनी अलीकडे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली होती.
००००