नवी दिल्ली : श्रीलंकेच्या नौदलाकडून वारंवार तामिळ मच्छिमारांवर कारवाई केली जात असल्याचे समोर आले आहे. अनेक तामिळ मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहिले असून श्रीलंकेच्या नौदलाकडून वारंवार पकडल्या जाणा-या तामिळ मच्छिमारांची सुटका करण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणि जप्त केलेल्या बोटींसाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेच्या अधिका-यांशी बोलण्यास सांगितले आहे. तसेच, २१ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीलंकेच्या अधिका-यांनी ३७ तमिळ मच्छिमारांना अटक केली. त्यांच्या बोटीही जप्त करण्यात आल्या आहेत. मायलादुथुराई येथील काँग्रेस खासदार आर सुधा यांनी मला या प्रकरणाची माहिती दिली, असे राहुल गांधींनी पत्रात म्हटले आहे.
अटक करण्यात आलेले मच्छिमार हे किना-याजवळ छोट्या प्रमाणात काम करतात. घटनेच्या दिवशी त्यांनी संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या बोटीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मच्छिमारांनी बचाव मदतीसाठी श्रीलंकेच्या अधिका-यांशी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले असे असतानाही आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या अधिका-यांनी मच्छिमारांना अटक केली. जप्त केलेल्या मासेमारी नौका सामूहिक संसाधनातून खरेदी करण्यात आल्या होत्या असेही राहुल गांधींनी पत्रात लिहिले आहे.
श्रीलंकेच्या अधिका-यांकडून लहान आणि सीमांत भारतीय मच्छिमारांना अटक करणे, मालमत्ता जप्त करणे आणि मोठा दंड ठोठावण्याच्या वारंवार घडणा-या घटनांचा तीव्र निषेध केला पाहिजे. तसेच, मी तुम्हाला विनंती करतो की, हे प्रकरण श्रीलंकेच्या अधिका-यांकडे मांडावे आणि मच्छिमार आणि त्यांच्या बोटींची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी पत्राद्वारे केली आहे.