लातूर : प्रतिनिधी
श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत, मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करावेत, रस्त्यावर आलेल्या झाडाचा फांद्या बाजूला हटवाव्यात आदी सूचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर महापालिकेचे आयुक्त यांना पत्र पाठवून केल्या आहेत. लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना पाठवलेल्या पत्रात माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, सततच्या पावसामुळे शहरात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत, पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे खोदकाम आणि इतर कामामुळेही रस्ते खराब होऊन जागोजागी चिखल निर्माण झाला आहे.
श्री गणेशोत्सवाच्या दरम्यान मिरवणुकांना या खड्ड्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, अनेक ठिकाणी मिरवणूक मार्गात झाडाच्या फांद्याही रस्त्यावर आल्या आहेत, आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे त्यामुळे महापालिकेने रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे, आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यावर आलेल्या झाडाच्या फांद्या हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कामाला लावावी, तहसील कार्यालयानजीक तसेच इतर काही ठिकाणी रस्त्याच्या डिव्हायडर मध्ये स्टील रॉड बसून युटर्न बंद केले आहेत. मिरवणुकीच्या दिवशी फक्त्त एक दिवसासाठी आवश्यकतेनुसार हे स्टील रॉड काढून घ्यावेत, असेही देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे, महापालिका प्रशासन युद्ध पातळीवर हे काम हाती घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.