कोल्हापूर : संकेश्वरनजीक भरधाव खासगी आराम बसचे ब्रेक लाइनिंग जाम होऊन घर्षणामुळे लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली. परंतु, केवळ दैव बलवत्तर म्हणून बसमधील २८ प्रवाशांसह चालक -वाहक सुखरूप बचावले. या दुर्घटनेत प्रवाशांच्या साहित्यासह बसचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वरनजीक सोलापूर फाट्यावर ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, ही आराम बस मुंबईहून बंगळुरूला जात होती. बसमध्ये एकूण २८ प्रवासी होते. शुक्रवारी पहाटे सोलापूर व हरगापूर गावच्या फाट्याजवळ पाठीमागील चाकाचे ब्रेक लाइनिंग जाम होऊन घर्षणामुळे बसला आग लागली. बसला आग लागल्याचे बसचालक सिद्धाप्पा यांच्या निदर्शनास आले. प्रसंगावधान राखून त्यांनी वेग कमी करत बस रस्त्याच्या कडेला घेतली आणि प्रवाशांना तातडीने खाली उतरवले,त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दरम्यान, पाठीमागील आग पसरत जाऊन इंजिन, गॅस टँक आणि वातानुकूलित यंत्रणेपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण बस पेटली. ही बातमी समजताच महामार्ग रुंदीकरण कामाचे ठेकेदार कंपनीचे भरारी पथक, संकेश्वर नगरपालिकेचे अग्निशमन दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी आराम बसचा केवळ लोखंडी सांगाडाच शिल्लक राहिला.