मुंबई : प्रतिनिधी
जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एका सत्कार सोहळ्यात आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरला. त्यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आम्ही निवडून आलेले प्रतिनिधी हे जनसेवक आहोत. आमदार संजय गायकवाड यांनी काय भूमिका मांडली, याबाबत मला बोलायचे नाही असे स्पष्ट मत बावनकुळे यांनी मांडले आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच काही ना काही वादग्रस्त विधान करत असतात. बुलडाणा जिल्ह्यातील जयपूर येथील कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना शिवीगाळसुद्धा केली. आमदार गायकवाड यांचा हा व्हीडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संजय गायकवाडांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलेला असतानाच आता याबाबत महायुतीतील नेते, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले की, आम्ही निवडून आलेले प्रतिनिधी हे जनसेवक आहोत. जनसेवकांनी जनतेच्या आणि मतदारांसमोर नतमस्तक होऊनच आपला कारभार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणच आपण अंगीकारून आम्ही सेवकांच्या भूमिकेत असले पाहिजे. त्यामुळे मतदारांबाबत त्यांनी (आमदार संजय गायकवाड) यांनी काय भूमिका मांडली, याबाबत मला बोलायचे नाही, असे मंत्री बावनकुळे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.