लातूर : प्रतिनिधी
नीट २०२४ पेपरफुटी प्रकरणातील संशयीत आरोपी संजय जाधव व जलीलखॉ पठाण यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना दि. ६ जुलै रोजी न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. सीबीआयने जलीलखॉ पठाण यास न्यायालयीन तर संजय जाधव यास आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. ती विनंती न्यायालयाने मान्य करुन पठाण यास १४ दिवसांची न्यायालयीन तर संजय जाधव यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पेपरफुटीच्या नवीन कायद्यानुसार येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संजय जाधव, जलीलखॉ पठाण यांच्यासह ईरन्ना मष्णाजी कोनगलवार व दिल्ली येथील गंगाधर मुंढे नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील चार संशयीत आरोपींपैकी संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखान पठाण यांना पोलीसांनी गजाआड केले असून ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. कोनगलवार कुटंूबासह फरार तर गंगाधर बेंगलोर येथे सीबीआय कोठडीत आहे.
चार दिवसाच्या कालावधीत सीबीआयने पोलीस, एटीएसने केलेल्या तपासाची पडताळणी केली असून सीबीआय व पोलीस कोठडीत संशयीत आरोपीकडून इतर तीघा संशयीतांची जी नावे समोर आली आहेत. त्यांची चौक शी केली आहे. तसेच सीबीआयने फरार असलेल्या इरण्णा कोनगलवार व संजय जाधव यांच्या घराची झडती घेतली आहे. यात संजय जाधव याचे थेट गंगाधरशी संबध असल्याचे समोर आले. शनिवारी संजय जाधव व जलीलखॉ पठाण यांना न्यालयात हजर केले असता न्यायालयाने जलीलखॉ पठाण यास १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत तर संजय जाधव यास दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.