नोकरीपेक्षा कुटुंबाला सुरक्षा हवी : धनंजय देशमुख
बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना केजमधील शिक्षण संस्थेत नोकरी देण्यात आली आहे. केज तालुक्यातील आडस गावातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी त्यांना नोकरी देण्यात आली आहे. ही शिक्षण संस्था रमेश आडसकर यांची आहे. परंतु नोकरीपेक्षा आम्हाला कुटुंबाच्या सुरक्षेची हमी हवी आहे, असे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
रमेश आडसकर आणि त्यांच्या सहका-यांनी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन अश्विनी देशमुख यांना नियुक्ती पत्र दिले. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. आता त्यांना आडसमधील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाल नोकरी देण्यात आली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींची बी टीम बीडमध्ये कार्यरत असल्याचा आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केला आहे. त्या बी टीमची अद्याप कोणतीही चौकशी झाली नसल्याचाही आरोप धनंजय देशमुखांनी केला. तसेच आम्हाला नोकरीपेक्षा सुरक्षा आवश्यक असल्याचे ते म्हणाले.