संभाजीनगर : प्रतिनिधी
उद्या (दि. १९ जानेवारी) छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मनोज जरांगे सहभागी होत आहेत. सर्वांनी उद्या या मोर्चाला उपस्थित रहा. कारण एका लेकीने हाक दिलेली आहे की, माझ्या बापाला न्याय देण्यासाठी मला बळ द्या. पाठिंबा द्या. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या मुलीच्या हाकेला आपण पाठिंबा देऊन उद्या संभाजीनगरमध्ये उपस्थित रहा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
‘सध्या जो तपास सुरू आहे. पोलीस, सीआयडी आणि एसआयटी असतील त्यामधली सगळी साखळी शोधणं खूप गरजेचं आहे. हे खूप मोठे रॅकेट आहे, लहान रॅकेट नाही. खूप मोठ्या गुंडाच्या टोळीचं साम्राज्य उभं केलेलं आहे. त्यामुळे याच्या खोलामध्ये जाणं खूप गरजेचे आहे. कारण हे खूप मोठे कुख्यात गुंड आहेत’ असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
एकही आरोपी सुटता कामा नये. कारण हे खूप मोठं षडयंत्र आहे. ही खूप मोठी टोळी आहे आणि ही सगळी संपली पाहिजे. कारण खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. अन्यथा नंतर लोक या विरोधात उग्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात येतील. ज्यांनी खून केला आणि ज्यांनी खंडणी मागितली. मागायला लावणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. त्याला आता घेणे गरजेचे आहे. ज्यांनी खंडणी वसूल करण्यासाठी लोक पाठवले आणि खून करण्यासाठी लोकं पाठवले. खून करणा-यापेक्षा आणि खंडणी मागणा-यापेक्षा ज्याने हा जो काही सामूहिक कट घडवून आणला हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.