23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसंपादकीयसंसदेला गळती!

संसदेला गळती!

सध्या पाऊस देशाला झोडपून काढतोय. जोरदार पावसाचा झटका राजधानी नवी दिल्लीलाही बसला आहे. हवामान विभाग अभ्यासक यांचे पाऊसमानविषयक अंदाज खरे ठरले आहेत. पावसाने मुंबई-पुण्याची, पश्चिम महाराष्ट्राची पुरती दैना उडवली आहे. विदर्भात आणि मराठवाड्यातही चांगला पाऊस होतोय. अजून पाच दिवस पाऊस जोरदार बरसेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. पुणे, सातारा, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकला नारंगी इशारा देण्यात आला आहे. नैऋत्य बिहार, वायव्य झारखंड आणि राजस्थानवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

पश्चिम किनारपट्टीवरही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर जास्त राहील तर मराठवाड्यातील काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. नवी दिल्लीत नव्या संसद भवनाला पहिल्याच पावसात गळती लागली. जेमतेम १४ महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करून उभ्या करण्यात आलेल्या नव्या संसद भवनाला गळती लागली. ३१ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे खासदारांच्या एका लॉबीत छतातून पाणी टपकू लागल्याने तेथे बादली ठेवण्याची वेळ आली. नव्या संसदभवनाचे उद्घाटन २८ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. जुन्या संसदेचे उद्घाटन १८ जानेवारी १९२७ रोजी झाले होते.

त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज जुन्या संसद भवनात सुरू होते. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी नव्या संसदेच्या बांधणीचा प्रकल्प हाती घेतला होता. काही महिन्यांपूर्वी भारतीय संसदेचे काम नव्या इमारतीमध्ये सुरू झाले. मोठ्या थाटामाटात नव्या संसदेचे उद्घाटन झाले होते. मोदींनी ‘शेंगोल’ स्थापन करून नव्या इमारतीचे उद्घाटन केले होते. उद्घाटन प्रसंगी साधू- संतांसह अनेकजण उपस्थित होते. जुन्या इमारतीमध्ये जागा कमी पडत होती म्हणून नव्या इमारतीची निर्मिती करण्यात आली असे सरकारकडून सांगण्यात आले. नव्या संसद इमारतीमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, विरोधकांनी या नव्या संसद इमारतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नव्या इमारतीत अनेक त्रुटी राहिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नव्या संसदेत गळती सुरू झाल्याने विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली. या मुद्यावरून विरोधक एनडीए सरकारला धारेवर धरू शकतात. भाजप यावर काय पवित्रा घेतो ते दिसेलच. दिल्लीत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले,

जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसाचा फटका नव्या संसद भवनालाही बसला. नव्या संसद भवनाच्या खासदार लॉबीमध्ये पाणी गळती झाली. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी ‘एक्स’वर चित्रफीत टाकल्यामुळे या गळतीला वाचा फुटली. सुमारे १२०० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नव्या इमारतीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असून खासदार टागोर यांनी सभागृहात चर्चेची मागणी केली आहे. टागोर यांनी संसद भवनातील गळतीबाबत गुरुवारी स्थगन प्रस्ताव दिला. संसदेबाहेर पेपरफुटी आणि संसदेच्या आत पाण्याची गळती अशी टीका त्यांनी केली. पाण्याची गळती झालेल्या लॉबीचा विद्यमान राष्ट्रपतींनी वापर केला होता. इमारत बांधून फक्त एक वर्ष झाले असताना पाण्याची गळती कशी होऊ शकते असा सवाल टागोर यांनी केला असून इमारतीच्या टिकाऊपणाचा मुद्दा गंभीर असून त्यावर तातडीने तोडगा काढला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. नव्या इमारतीची सखोल पाहणी करण्याची गरज असून त्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमण्याची मागणीही त्यांनी केली.

संसदेची नवी इमारत पर्यावरणस्नेही असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र निसर्गाचे तिच्यावर इतके प्रेम असेल असे वाटले नव्हते, असा टोला काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी लगावला. ‘१२०० कोटींच्या इमारतीला १२० रुपयांच्या बादलीचा आधार’ अशी टिप्पणी आम आदमी पक्षाने केली. समाजवादी पक्षाचे प्रमुख व लोकसभेतील खासदार अखिलेश यादव यांनी नव्या इमारतीच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला आहे. या संसदेपेक्षा जुनी इमारत चांगली होती. तिथे जुने सहकारी येऊन भेटत तरी होते. पुन्हा एकदा त्या जुन्याच संसद भवनात जाऊ. संसदेच्या छतातून पाणी पडणे बंद होत नाही तोवर तरी जाऊ. भाजप सरकारच्या काळात बांधलेल्या प्रत्येक छतातून पाणी टपकते. हा त्यांनी खूप विचारपूर्वक रचना केल्याचा परिणाम असेल की आणखी काही असा सवाल अखिलेश यांनी केला.

भारतातील कष्टकरी करदात्यांचे १२०० कोटी रुपये खर्च करून निकृष्ट दर्जाचे नवे संसदभवन उभारले परंतु मुसळधार पावसामुळे अवघ्या १४ महिन्यांत नव्या संसद भवनात गळती सुरू झाली. ही आहे मोदी सरकारची निकृष्ट कामांची गॅरंटी…! असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोदींवर निशाणा साधला. काही महिन्यांपूर्वी अयोध्येतील राम मंदिराला गळती लागल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता नव्या संसद भवनाला गळती लागल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे. राम मंदिर बांधून एक वर्ष झाले पण एकाच पावसात राम मंदिरात गळती लागली. आता नव्या संसद भवनालाही गळती लागली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, जुनी इमारत सुस्थितीत होती, ती अजून अनेक वर्षे चालली असती. ग्रीक आणि इतर देशांच्या संसद इमारती जुन्याच आहेत.

ठेकेदारांना काम दिल्याने हा प्रकार घडला आहे. ठेकेदार आणि सरकारचा हिशेब झाला पाहिजे. कोणाला किती कमिशन मिळाले हे उघड झाले पाहिजे असे राऊत म्हणाले. गत ७० वर्षांत देशात काहीच घडले नाही अशी वारंवार टीका करणा-यांच्या दहा वर्षांच्या कालावधीत बांधलेल्या अतिशय महत्त्वाच्या दोन वास्तूंत पहिल्याच पावसात जलाभिषेक होणार असेल तर त्यांचा दर्जा काय आहे हे स्पष्ट दिसते आहे. गत ७० वर्षांत बांधलेली धरणे, जलविद्युत प्रकल्प, जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था एखादा अपवाद वगळता आजही ताठ मानेने उभ्या आहेत. आज वास्तुशास्त्र अद्ययावत झाले असताना अशा गळक्या इमारती बांधून दाखवणे हा पराक्रमच म्हटला पाहिजे. ‘नल से जल’ योजना ऐकली होती पण ‘छप्पर से जल’ हा भीमपराक्रमच म्हटला पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR