कोल्हापूर : प्रतिनिधी
विशाळगड हिंसाचार प्रकरणावरून कोल्हापुरातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं आहेत. कारण या हिंसाचाराविरोधात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. पण याला सकल हिंदू समाजाने विरोध दर्शवला असून १९ जुलै रोजी ‘कोल्हापूर बंद’ची हाक देण्याचा इशारा दिला आहे.
विशाळगड हिंसाचारप्रकरणी इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, या मोर्चाला सकल हिंदू समाजाने कडाडून विरोध दर्शवला आहे.
इम्तियाज जलील जर कोल्हापुरात आले तर त्यांचे कोल्हापुरी पायतानाने स्वागत करू तसेच या घटनेविरोधात एमआयएमने कोल्हापुरात मोर्चा काढल्यास १९ जुलैला सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘कोल्हापूर बंद’ची हाक देण्यात येईल, असा इशारा हिंदू एकता संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिला आहे.
…तर मोर्चाने उत्तर देणार – मनसे
एमआयएमकडून जलील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात शुक्रवारी (ता. १९) निषेध मोर्चा निघणार आहे. याला विरोध करताना जलील आणि त्यांच्या सहका-यांवर जिल्हा पोलिस प्रशासनाने तात्काळ कोल्हापूर जिल्हा बंदीचा आदेश लागू करावा.
यानंतरही जर जलील कोल्हापूरमध्ये मोर्चा काढणार असतील तर त्यांच्या मोर्चाला मनसे, सकल हिंदू समाजाकडून मोर्चाद्वारे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी पत्रकार परिषदेत दिला.