29.2 C
Latur
Saturday, June 29, 2024
Homeमहाराष्ट्रसगेसोयरेबाबत सर्व सहमतीने निर्णय घेऊ

सगेसोयरेबाबत सर्व सहमतीने निर्णय घेऊ

लोकसभेची सूज विधानसभेत उतरवू : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या गुरुवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. तत्पूर्वीच पूर्वसंध्येला आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करून थोडा-फार फायदा झाल्याने विरोधकांनी पुन्हा तोच प्रयोग सुरू केला आहे; पण आता लोक फसणार नाहीत. २ वर्षात आमच्या सरकारने केलेले काम लोकांसमोर आहे. त्यामुळे लोकसभेत आलेली सूज विधानसभा निवडणुकीत उतरेल, असा पलटवार केला. मराठा समाजाला आरक्षण देताना अधिवेशनादरम्यान होणा-या सर्वपक्षीय बैठकीत सगळ्यांची मते ऐकून घेऊन सगेसोय-यांबाबत निर्णय करू, असेही ते म्हणाले.

गुरूवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहापानाचे आयोजन केले होते. मात्र विरोधकांनी त्यावर बहिष्कार घातला. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांना व टीकेला उत्तर दिले. या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन होते. आम्हाला वाटले विरोधी पक्ष चहापानाला येतील. जनतेचे प्रश्न सुटायला मदत होईल; पण तसे झाले नाही. सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची, उत्तरे द्यायची आमची तयारी आहे; पण त्यांची तयारी नाही. त्यांना मीडियात येऊन फक्त खोटे नरेटिव्ह तयार करण्यात रस आहे. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, असा खोटा प्रचार केला. त्याचा थोडा फायदा झाल्याने क्षणिक आनंद मिळाला. लोकसभेतील मतं म्हणजे सूज आहे. फसवून ती मते मिळाली. विधानसभेत ही सूज उतरेल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

खोट्या नरेटिव्ह फॅक्टरीचा पर्दाफाश करणार
विरोधी पक्षाकडून पाठवण्यात आलेले बहिष्काराचे पत्र म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटे नरेटिव्ह तयार करून निवडणुकीत मते मिळाल्यानंतर आता खोटेच बोलण्याच्या मानसिकतेत विरोधी पक्ष गेला आहे. खोटे नरेटिव्ह तयार करण्याची फॅक्टरी त्यांनी उघडली आहे. त्याचा पर्दाफाश या अधिवेशनात आम्ही निश्चित करू.

जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा हा प्रकार असून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात. हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. आमचे कधीच याला समर्थन नाही उलट विरोधच आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR