28.4 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeसोलापूरसगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी समाज बांधव आक्रमक

सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी समाज बांधव आक्रमक

वैराग : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, सगेसोयरे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी चौकात भर पावसात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, बार्शी तालुक्यातील मुंगशी विद्यालयाला मनोज जरांगे पाटलांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे. आंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत.

त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दररोज वेगवेगळ्या गावांत आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीची गांभीर्याने सरकारने दखल घेऊन लवकरात लवकर मराठा समाजासाठी सगेसोयरे कायदा लागू करण्यात यावा; अन्यथा, येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक तानाजी पवार, मंडळ अधिकारी वीरेश कडगंजी यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी तलाठी महेश जाधव, गोपनीय शाखेचे किसन कोलते आदींसह मराठा बांधव उपस्थित होते.

बार्शी तालुक्यातील मुंगशी (दहिटणे) येथील मुंगशी विद्यालयास मनोज जरांगे पाटील यांचे नाव देण्याचा ठराव संस्थेचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर केला असून, महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंगशी विद्यालय या शाळेचे नाव यापुढे मनोज जरांगे पाटील विद्यालय, मुंगशी (दहिटणे) असणार आहे. मुंगशी येथे १९९८ मध्ये जय जगदंबा शिक्षण संस्था सर्जापूरचे संस्थापक शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके यांनी मुंगशी विद्यालयाची स्थापना केली. या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे.

सध्या विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग चालू आहेत. या शाळेत मुंगशी, दहिटणे येथील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे दहावीच्या शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम आहे. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजासाठी मोठे योगदान आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर शालेय विद्यार्थ्यांसह समाजाला याचा मोठा फायदा होणार आहे. कोणत्याही समाजाला न दुखावता आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील लढत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजासाठी फार मोठे योगदान आहे. कोणत्याही समाजाला न दुखावता त्यांचे आंदोलन सुरू आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या आदेशाने आम्ही कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर गेलो नव्हतो. त्यांचे नाव मुंगशी विद्यालयाला देण्याचा ठराव केला आहे. असे सर्जापूर येथील जय जगदंबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR