20.4 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रसत्तार यांनी ५ हजार अल्पवयीन मुलांची नावे मतदारयादीत घुसवली

सत्तार यांनी ५ हजार अल्पवयीन मुलांची नावे मतदारयादीत घुसवली

पराभवानंतर बनकर यांचा आरोप

सिल्लोड : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे अब्दुल सत्तार २४२० मतांनी विजयी झाले. त्यांच्या या विजयाबद्दल अजूनही मतदारसंघात शंका उपस्थित केल्या जात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश बनकर यांनी आपल्या निसटत्या पराभवावर अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले.

सत्तार यांनी आपल्या संस्थेतील शाळेच्या तब्बल ५ हजार अल्पवयीन मुलांची बोगस जन्मतारखेचे दाखले आणि त्या आधारे आधार कार्ड तयार करून मतदार यादीत नावे घुसवल्याचा दावा करत सुरेश बनकर यांनी खळबळ उडवून दिली. या बोगस मतांच्या आधारेच अब्दुल सत्तार यांनी हा विजय मिळवला. मतदारांनी आपल्यालाच कौल दिला होता मात्र बोगस मतदानामुळे लोकशाहीचा गळा घोटला गेला.

धनशक्तीविरोधात झालेल्या लढतीत जनशक्तीचा पराभव झाला, असे म्हणत सुरेश बनकर यांनी सत्तार यांच्या विजयावर आक्षेप घेतला. मतदारसंघांमध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरोधात प्रचंड रोष होता. प्रचार सभा, पदयात्रा आणि बैठकांमधून तो स्पष्टपणे दिसत होता. मात्र नेहमीप्रमाणे बोगस मतदारांची नोंदणी आणि दुबार मतदार नावांवर आम्ही घेतलेल्या तक्रारीची कुठलीच दखल प्रशासनाने घेतली नाही. याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला.

मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवत भरभरून मतदान केले म्हणूनच मी एक लाख पस्तीस हजार मतांची मजल गाठू शकलो. मात्र जाती-धर्मात तेढ निर्माण करून वातावरण बिघडवण्याचे काम आणि बोगस मतदारांच्या जीवावर मिळवलेला सत्तार यांचा हा विजय आहे, असा आरोपही बनकर यांनी केला.

पराभवानंतर मतदारसंघात काढलेल्या आभार दौ-यात मला लोकांची प्रचंड सहानुभूती मिळत आहे. लोक गळ्यात पडून रडत आहेत, हे प्रेम जनतेने मला दिले आहे. यावरून विजय नक्की कोणाचा झाला? हे स्पष्ट होते. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात झालेला पराभव हा माझा नसून जनशक्ती आणि लोकशाहीचा आहे.

सत्ताधा-यांनी प्रशासनावर दबाव आणून दुबार नावे, बोगस नावे, शहरातील मतदारांची नावे तर काही ठिकाणी चक्क मृत झालेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत दिसली. या विरोधात आम्ही निवडणुकीआधीच आवाज उठवला होता मात्र प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. प्रशासनावर दबाव टाकून मिळवलेला सत्तार यांचा हा विजय असल्याचेही बनकर यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR