23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूर‘सभ्य गृहस्थहो’ नाटकाचे सादरीकरण; नाट्यरसिकांनी दिली दाद

‘सभ्य गृहस्थहो’ नाटकाचे सादरीकरण; नाट्यरसिकांनी दिली दाद

लातूर : प्रतिनिधी
नाट्य स्पंदन प्रतिष्ठाण लातुरच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळींचा सहभाग असलेल्या ‘सभ्य गृहस्थहो’ या दोन अंकी विनोदी नाटकाचे रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती भवन येथे सादरीकरण झाले. नाट्यरसिकांनी या नाटकाचा मनमुराद आनंद घेत भरभरुन दाद दिली.
‘सभ्य गृहस्थहो’ नाट्य प्रयोगाचा शुभारंभ राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचेमाजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करुन करण्यात आला. नाट्य रसिकांनी सदरील नाटकाचा मनमुराद आनंद घेतला. जयवंत दळवी लिखीत ‘सभ्य गृहस्थहो’ या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रकांत शिरोळे यांनी केले. त्यांना सह दिग्दर्शक म्हणून डॉ. अभय ढगे आणि डॉ. मुकुंद भिसे यांनी सहकार्य केले. नाटकाचे नेपथ्य दत्तात्रय राऊत आणि डॉ. वेंकट येलाले यांचे होते.  संजय आयचीत यांची प्रकाश योजना होती. संगीत संयोजन डॉ. अभय ढगे आणि दयानंद सरपाळे यांनी केले. भारत थोरात, डॉ. अनघा राजपूत, डॉ. वैशाली टेकाळे यांची रंगभूषा, वेशभुषा होती. गणेश पवार, नंदकुमार वाकडे, संदीप सहाणे यांनी रंगमंच व्यवस्थेची बाजू सांभाळली.
या नाटकात डॉ. वेंकट येलाले, डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. भागवत शेळके, डॉ. शीतल टिके, डॉ. संजय मुंडकर, डॉ. शिल्पा दडगे, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. अभिजित येलाले, डॉ. मुकुंद भिसे, डॉ. विनया बनशेळकिकर, डॉ. संदीप सहाणे, डॉ. अभय ढगे यांनी भुमिका अत्यंत  ताकदीने साकारल्या. या नाटकाचा माजी मंत्री अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळे यांच्यासह मान्यवरांनी मनमुराद आनंद घेतला. यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते खासदार डॉ. शिवाजी काळगे यांना नाट्य स्पंदन प्रतिष्ठानचे मानद सदस्यत्व देऊन सन्मानीत करण्यात आले.  यावेळी डॉ. चंद्रकांत शिरोळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहराध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, अ‍ॅड. समद पटेल, सचिन बंडापल्ले, लक्ष्मण कांबळे, कैलास कांबळे, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. अमित उटीकर यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील  मान्यवर मंडळी, नाट्य रसिक लातुरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR